रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे यंदाच्या भाद्रपद गणेशोत्सवात १० तास आणि ३० मिनिटात तब्बल ६१. ६ किमी अंतर पार करत एकाच दिवसात महागणपतीची द्वारयात्रा करण्याचा अनोखी कामगिरी हरेश बाळासाहेब पाचुंदकर पाटील (वय ४०) यांनी केला आहे. या कामगिरीबद्दल रांजणगावसह संपुर्ण पंचक्रोशीतुन सोशल मिडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अनेक वर्षांची परंपरा लाभलेले आणि ‘एक गाव, एक गणपती’ हे वैशिष्ट्य असलेले महागणपतीचे रांजणगाव येथे दरवर्षी भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव व द्वारयात्रा असते. प्रथेप्रमाणे भाद्रपद गणेशोत्सवात श्री महागणपतीच्या करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव खालसा, ढोकसांगवी चारही गावात असलेल्या बहिणींना आणण्यासाठी द्वारयात्रा काढली जाते. वरील चारही गावांत रांजणगावचे ग्रामस्थ बालगोपालांसह अनवाणी पायी द्वारयात्रा करतात.
रांजणगावचे हरेश पाचुंदकर पाटील हे बुधवार (दि २७) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रांजणगाव गणपती येथुन द्वारयात्रेसाठी पायी निघाले पुर्वद्वार दोनलाई देवी (करडे), दक्षिणद्वार शिरसाई देवी (निमगाव म्हाळुंगी), पश्चिमद्वार ओझराई देवी (गणेगाव खालसा), उत्तरद्वार मुक्ताई देवी (ढोकसांगवी) या चारही द्वारयात्रा त्यांनी तब्बल ६१. ६ किमी अंतर पार करत १० तास आणि ३० मिनिटात पुर्ण केल्या. यात त्यांना पायी चालण्यास सलग ८:३० तास तर इतर २ तास वेळ देवीच्या मंदिरात जलाभिषेक आणि दर्शनासाठी लागला.

चारही द्वारयात्रा पुर्ण करुन सकाळी १० वाजता हरेश पाचुंदकर हे रांजणगाव महागणपती येथील मंदिरात आले. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केल. तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कामगिरीबद्दल रांजणगाव गणपतीसह पंचक्रोशीतुन सोशल मिडियातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव डॉ तुषार पाचुंदकर पाटील यांचे ते भाऊ आहेत.
रांजणगावला भाद्रपद गणेशोत्सवाची जय्यत तयारी; महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन