शिरुर तालुक्यातील कुत्रीम पाणवठे वन्य जीवांना वरदान

शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात वीस ठिकाणी शिरुर वनविभागाकडून पाणवठे

शिक्रापूर: उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेले असताना कित्येक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे पशु पक्षांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. मात्र शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वनविभागाच्या वतीने कुत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून सदर पाणवठे ऐन उन्हाळ्यात पशु पक्षांसाठी वरदान ठरत आहेत.

शिरुर तालुका नेहमी दुष्काळी समजला जातो. मात्र शिरुर तालुक्यात शेतीची संख्या जास्त असल्याने वन्य पशु पक्षांची संख्या देखील मोठी आहे. उन्हाळ्यात कित्येक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ निर्माण होत असतो. परंतु पशु पक्षांना पाणी उपलब्ध करण्यासाठी शिरुर वनविभाग नेहमीच पुढाकार घेत असताना शिरुर तालुक्यातील दुष्काळी तसेच जंगलाच्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरात शिरुर वनविभागाच्या वतीने सध्या मोराची चिंचोली, पाबळ, मलठण, सोने सांगवी, पिंपळवंडी, शिरुर यांसह आदी ठिकाणी कुत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले असून त्या ठिकाणी टँकर ने पाणी पुरविले जात असल्याने वन्य पशु पक्षांना पाण्याची सोय करण्यात येत असल्याने पशु पक्षांना पाण्याची मोठी सोय होत आहे.

शिरुर तालुक्यात पूर्वीचे काही पाणवठे असून वनविभागाच्या वतीने नव्याने काही पाणवठे तयार करण्यात आले असताना सर्व ठिकाणी शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी गणेश पवार, गणेश म्हेत्रे, नियतक्षेत्र अधिकारी ऋषिकेश लाड, सविता चव्हाण, अभिजित सातपुते यांसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष लक्ष ठेवून असतात, इतकेच नव्हे तर शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी पक्षी मित्रांकडून पक्षांना धान्य व पाण्याची सोय केली जात आहे.

शिरुर वनविभाग व पक्षी मित्रांच्या सुरु असलेल्या कार्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पशु पक्षांना धान्य, पाणी उपलब्ध होत असल्याने शिरुर तालुक्यातील वनविभागाने निर्माण केलेले कुत्रिम पाणवठे ऐन उन्हाळ्यात पशु पक्षांसाठी वरदान ठरत आहेत.

नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे; शेरखान शेख (निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्था)

वन्य पशु पक्षी आपली संपत्ती असून वन्य पशु पक्षांच्या संवर्धनासाठी वनविभाग नेहमी पुढाकार घेत आहे. मात्र नागरिकांनी देखील वन्य पशु पक्षांच्या अन्न पाण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांनी सांगितले.

नागरिकांनी वन्य प्राण्यांना त्रास देऊ नये; मनोहर म्हसेकर (वनपरिक्षेत्र अधिकारी)

शिरुर तालुक्यातील ज्या ठिकाणी वन्य पशु, पक्षी आढळून येतात तेथे आम्ही पाणवठे तयार करत पाणी उपलब्ध करत असून पाणवठ्यावर वन्य प्राणी आल्यास त्यांना नागरिकांनी त्रास देऊ नये असे आवाहन शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केले आहे.