इंस्टाग्रामवर कोयत्याचे प्रदर्शन करुन दहशत करणे पडले महागात; शिरुर पोलिसांनी दोघांना केले गजाआड

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एका गावातील दोन युवकांनी बेकायदेशीर तसेच विनापरवाना कोयता जवळ बाळगून मंदिरामध्ये जावुन त्याची पुजा करुन सदर पुजेचा व्हिडीओ बनवुन तो व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून सोशल मीडियावरुन गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत केला. शिरुर पोलिसांना खबऱ्यामार्फत याची माहिती मिळताच त्यांनी 1) रोहित महादेव हरिहर (वय 28) आणि 2) सिध्देश संतोष वेताळ (वय 19) रा. आलेगाव पागा, ता. शिरुर, जि पुणे या दोघांना तातडीने अटक करत सदर हत्यार जप्त केले आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (दि 22) रोजी दुपारी 15:45 च्या सुमारास आलेगाव पागा (ता. शिरुर) येथील रोहित महादेव हरिहर आणि सिध्देश संतोष वेताळ या दोन युवकांनी बेकायदेशीर विनापरवाना कोयता जवळ बाळगून मंदिरामध्ये जावुन त्याची पुजा करत सदर पुजेचा व्हिडीओ बनवुन तो व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करुन सोशल मीडियावरुन गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याची माहिती खबऱ्यामार्फत शिरुर पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत त्या दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे एक लोखंडी धातुचा धार असलेला 12 सेंटीमीटर लाकडी मुठीपासुन लांब आणि चार सेंटीमिटर लांब लाकडी मुठ असलेला कोयता बेकायदेशीरीत्या विनापरवाना जवळ बाळगल्याचे आढळून आले. याबाबत पोलिस अंमलदार नितेश थोरात यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे या दोन युवकांविरोधात फिर्याद दिली दिली आहे.

सदरची कारवाई शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, अभिजित पवार, पोलीस अंमलदार विनोद मोरे, सचिन भोई, राजेंद्र गोपाळे यांनी केली आहे.

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत सोशल मीडियाद्वारे अशा प्रकारचे व्हिडिओ, रिल्स, फोटो अपलोड करुन दहशत माजविण्याचा प्रकार करणाऱ्याविरुद्ध पोलिसांकडुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपली मुले सोशल मीडिया अकाउंटवरुन कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट करणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले आहे.