महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून कायदा करावा; डॉ. अमोल कोल्हे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केले जात असून अनेक महापुरुषांचा देखील अवमान केला जात असल्याने महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केली आहे.

महाराष्ट्रामध्ये वारंवार महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केले जात असल्याने शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून संसदेने स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी केली. मात्र यावेळी काही वेळेत माईक बंद करत संसदीय कामकाज काही काळ बंद करण्यात आले.

त्यावेळी याबाबत बोलताना संसदेच्या अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रात वारंवार अवमान जनक वक्तव्य होत आहेत. त्या संदर्भात ठोस कायद्याची तरतूद व्हावी जेणेकरुन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमान जनक वक्तव्य करण्याची कोणाचीही हिम्मत होऊ नये, यासाठी वेळ मागितला होता तो वेळ देण्यात देखील आला. मात्र सुरुवात झाल्या बरोबर अवघ्या दोन वाक्यांमध्ये माईक बंद करण्यात आला.

परंतु माईक बंद केला तरी शिव भक्त्यांच्या भावना व त्या भावनांचा आवाज बंद करता येणार नाही तो आवाज कानठळ्या बसवल्या शिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची कोणाचीही छाती होऊ नये, कोणत्याची संविधानक पदावर असेल, कोणत्याची जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीची छाती होऊ नये, यासाठी संसदेने कायद्यात ठोस तरतूद करावी सगळ्याच महापुरुषांच्या बाबत हा कायदा करण्यात यावा, अशी माझी मागणी असल्याचे देखील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.