शिक्रापूरच्या कोयाळी पुनर्वसन शाळेने मिळवला अध्यक्ष चषकाचा बहुमान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कोयाळी पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेने पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा अध्यक्ष चषकाचा पुरस्कार यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेने मिळविला असून शाळेने केलेल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीने जिल्ह्यात दबदबा निर्माण केलेल्या या शाळेला अध्यक्ष चषकचा मान मिळाल्याने शिक्षण क्षेत्रात शिरुर तालुक्याचे वर्चस्व यानिमित्ताने जिल्ह्यात पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कोयाळी पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार केली असून प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत वाढता आलेख निर्माण केला आहे. नुकतेच पुणे येथील अल्प बचत भवन येथे नुकत्याच पार पडलेल्या समारंभात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा अध्यक्ष चषक देवून या शाळेला गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद होते. तर याप्रसंगी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सविता बगाटे, आशा बुचके, शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड यांच्यासह जिल्ह्यातील इतर पुरस्कार्थी शाळांचे प्रतिनिधी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच कोयाळी पुनर्वसन शाळेचे मुख्याध्यापक संतोष विधाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश करंजे यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि समितीच्या सदस्यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. तर उत्तम भौतिक सोयीसुविधा, आणि त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता कायम राखत या शाळेने गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. 5 वर्षांपूर्वी एक हजार पटसंख्या असणाऱ्या या शाळेत सुमारे 2 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेत राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान दरवर्षी या शाळेला मिळत असतो. शाळेने अध्यक्ष चषक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या शिक्षकांचे आमदार ॲड. अशोक पवार, गटविकास अधिकारी अजित देसाई, गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, केंद्र प्रमुख राजेंद्र टिळेकर, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे यांसह आदींनी अभिनंदन आहे.