ramdas thite

भावी पीढीसाठी शिक्षकांचे योगदान सर्वश्रेष्ठ…

शिरूर तालुका

५ सप्टेंबर, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होत आहे. त्यांच्या विचारांचे पाईक, भावी पीढीच्या उत्कर्षाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांचे योगदान निश्चितच प्रशंसनीय व राष्ट्रहिताचे आहे. शिक्षणाचे नवे जग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि जागतीकीकरणाचे संदर्भ समजावून घेत पुढे जाण्याचा संकल्प करुया. तमाम शिक्षक बांधव – भगिनिंना आजच्या शिक्षकदिनी मनःपूर्वक शुभेच्छा…

शिक्षण आणि संस्कारांचा ध्वज उचलून धरताना इमारती, खोल्या, वर्ग यांत शिक्षण कोंबून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. नव्या डिजीटल माध्यमांचा व आंतरराष्ट्रीय संकल्पनांचा विचार करून विद्यार्थी जगताच्या इच्छा -आकांक्षा प्रत्यक्षात येण्यासाठी शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.

शिक्षणतत्वाचे आचरण काय सांगते?
विद्यालयांत प्रविष्ट होताना संबधित विद्यालया बाबत संशोधन, अध्यापन पद्धती, सहशालेय उपक्रम, शाळेचा दर्जा, इतिहास आणि शिक्षण तपस्वी अध्यापक यांची ओढ असायला हवी. कार्पोरेट इमारती, क्लासेसच्या जाहीराती यांची भुरळ न पडता शिक्षण तत्व, राष्ट्र प्रेम, राष्ट्र निष्ठा, चारित्र्य आणि नागरिकत्वाचे संवर्धन याबाबत पालक -विद्यार्थी चौकस असणे गरजेचे आहे. लाखो रुपये देउन प्रवेश मिळविणे यापेक्षा प्राध्यापक, अध्यापक यांच्या ओढीनं प्रवेश घेणं हे शिक्षण तत्वाचे खरे आचरण होय.

शिक्षणातील स्थित्यंतरे….
सन१९९२पासून जागतिकीकरण आणि उदारीकरणाला सुरुवात झाली. शिक्षणांतील राष्ट्रीय उद्दीष्टे, धोरणे ज्या मूल्यांसाठी समोर शिक्षणांमुळे विद्यार्थी आणि समाज घडला पाहीजे ही भूमिका स्पष्ट झाली त्याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. व्यवसायाभिमुख, कौशल्य सेतू अभ्यासक्रम असतानांही केवळ नोकरीसाठी शिक्षण या भूमिकेला चिकटून मंडळी वेगळया दिशेने प्रवास करत आहेत.

केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा मोहिम, शिक्षण हक्क कायदा, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान, नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान, संच मान्यता, आधारकार्ड नियमितता, बायोमेट्रीक प्रणाली, शालेय पोषण आहार या आणि अशा अनेक कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरु झाली. योजनांमुळे आपण पुढे जात असलो तरी विद्यार्थ्यांची मुलभूत कौशल्ये मात्र वाढतांना दिसत नाहीत. कोणताच वर्ग लेखन, वाचन, श्रवण, संभाषण कौशल्यांत१०० टक्के साक्षर दिसत नाही, हे शिक्षण व्यवस्थेतील मोठे आव्हान उत्तरदायित्व म्हणून आम्हांस स्विकारावे लागेल.

भारतीय शिक्षणातील वास्तव चित्र…
शिक्षणाने नागरिकत्वाचे संवर्धन व्हावे, अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच विद्यार्थी स्वावलंबी बनावा ही शिक्षण भूमिकेची खरी गरज आहे. शिक्षणाने व्यक्तीच्या जीवनांत सुसंवाद, सामर्थ्य, सर्जनशीलता, नव विचारप्रवाहांचे दालन खुले व्हावे आणि उपयोजनात्मक विचारधारा अंगभूत व्हावी यासाठी राज्य आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा मांडला गेला आहे.
आजही वास्तव असे आहे, १लीत ५० मुले दाखल झाली तर केवळ १९ टक्केच विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. प्रगत देशात हे प्रमाण ५० टक्के आहे. आपणांस स्थगन आणि गळती या प्रकारांना बाजूला सारत हे प्रमाण २०२०पर्यंत ३० टक्क्यांपर्यंत न्यावे लागेल.
प्रादेशिक असमतोल, प्रति विद्यार्थी खर्चाचे अत्यल्प प्रमाण, असमाधानकारक अध्ययन_ अध्यापन प्रक्रिया, व्यवस्थापनातील दबाव, गैरव्यवहार या बाबींमुळेही शिक्षणाला जागतिक उंचीवर नेण्यास आपण असमर्थ ठरत आहोत. भारत सरकारने शिक्षणासाठी घरेलू उत्पादनाच्या किमान १५ टक्के शिक्षणावर खर्च करणे अत्यंतिक गरजेचे आहे.

प्रिय अध्यापक _ प्राध्यापक..
शैक्षणिक दर्जा ठरविणाऱ्या खालील घटकांव्दारे शिक्षणाचे शिवधनुष्य आपण उचलून धरूया…
१ ) विद्यार्थी – शाळेचा जन्म मुलांमुळे आहे. प्रत्येक विद्यार्थी अद्वितीय आहे. गुणवत्तेसाठी चांगले, कृती युक्त, तंत्र स्नेही, मनोरंजक अध्यापन करूया. आपण ते करत आहातच पण नाविण्याचा ध्यास घेत जे सर्वोत्तम त्याचा वापर करुया…
२ ) पालक -पालकांकडून आपले सदैव मूल्यमापन होत असते. त्यांच्या इच्छा _ आकांक्षांना प्रगतीचे बळ देउया. पालकांनी प्रेरणा, प्रोत्साहन आणि सुसंवादाने शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे.
३) समाज – आपल्या दैनंदिन कामात पालकांना स्वारस्य नाही.१०वी / १२ निकाल १०० % लागला उत्तम.. यापेक्षाही किती विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले, किती नीट, जेईई, आयआयटी परिक्षेत झळकले, किती प्रशासनात गेले, कोण उद्योग व्यवसायांत स्थिर झाले यासाठी समाज दक्ष असतो.
४ ) शिक्षक -शिक्षकेतर -मुख्याध्यापक – या घटकांमध्ये एक विश्वासाचे व संघकार्याचे नाते हवे. कायद्यासाठी स्टाफ नव्हे, स्टाफ साठी कायदा आहे. कायदा सुलभ व्यवस्थापनाच्या भूमिकेतून शिक्षणाची चळवळ उभारूया..
५ ) शासन – प्रशासन
वेळच्या वेळी विद्यालय अनुदान, शिक्षक अनुदान, वेतनेतर अनुदान ,शासन निर्णय ,धोरणे याबाबत केंद्र आणि राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावेत. तुकडया-तुकडयांनी घेतलेले निर्णय सर्वंकष शिक्षण विकासाची जागा घेउ शकत नाहीत.
एकूणच देशातले उद्योगपती, राजकीय नेते, संशोधक, विचारवंत, खेळाडू, कलाकार यांच्या जडणघडणी मागे त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांचा हातभार होता याचा विसर पडता कामा नये.

डॉ. राधाकृष्णन, वेंकटरामन, डॉ. अब्दुल कलाम, डॉ शंकर दयाळ शर्मा या राष्ट्रपतींनी उच्च पदावर राहूनही शिक्षक या घटकांस महत्व दिले. उच्च पदस्थ असतानाही अध्यापनाचे पवित्र काम आत्मीयतेने पार पाडले. आपणही तोच आदर कायम ठेउया कारण यातच राष्ट्रहित जपलं आहे.

‘समाज घडविण्याची जबाबदारी नजरेआड न करता शिक्षकांनी सक्षमपणे अध्यापनाचे कामकाज पार पाडावे. शिक्षणातून सामाजिक योगदान घडले पाहिजे. क्रमिक अभ्यासक्रम म्हणजे शिक्षण नव्हे त्या पलीकडे जाऊन शिक्षणाच्या नव्या संकल्पना, विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाचा विकास यासाठी सदैव कार्यरत राहावे. माणसाच्या आंतरिक क्षमतांचा विकास करण्याचे सामर्थ्य शिक्षणाव्दारे दिसून यावे अशी अपेक्षा आहे.’
– सुरज मांढरे, आयुक्त -शिक्षण महाराष्ट्र राज्य.

– श्री. रामदास थिटे
प्राचार्य श्री. संभाजीराजे माध्य व उच्च माध्य. विद्यालय.
उपाध्यक्ष – पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ.