कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य करा…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्या करत शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले असून राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर यांना देखील शिक्षक संघटनेच्या मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेतली.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस संतोष फाजगे, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. किरण खाजेकर, प्रा. सुंदर लोंढे, समन्वयक प्रा. विक्रम काळे, विभागीय सहचिटणीस हिम्मत तोबरे, प्रा. एम. एस. शहापुरे, कार्यकारणी सदस्य प्रा. जितेंद्रकुमार थिटे, बब्रुवान घोडके, आदिनाथ दहिफळे यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्यामध्ये शाळेबाबत मूल्यांकन पात्र घोषित कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांना प्रचलित निकषानुसार तातडीने व रोखीने अनुदान देण्यात यावे, वाढीव पदांना नियुक्ती दिनांक पासून मान्यता वेतन देण्यात यावे, आय टी (माहिती तंत्रज्ञान) विषय शिक्षकांना अनुदान व वेतन देण्यात यावे, 10 ते 30 वर्षाच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना लागू करण्यात यावी.

एक नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या व नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, रिक्त पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवणे, एनपीएस मध्ये शिक्षकांना ऐच्छिक कपातीची परवानगी देण्यात यावी, कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्या मधील विद्यार्थी संख्या शाळांना जोडली असल्यास साठ व किंवा वरिष्ठ महाविद्यालय संलग्न असल्यास 80 असावी, तासिका तत्वावरील शिक्षकांचे व शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्यात यावे, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, अकरावी कला शाखेला कमीत कमी वीस विद्यार्थी संख्या मान्य करावी.

जोपर्यंत कार्यभार शून्य होत नाही तोपर्यंत शिक्षकास अतिरिक्त ठरवू नये, इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुधारणा करुन अकरावीचे वर्ग सुरू करण्याबाबत होत असलेली दिरंगाई टाळावी, अर्धवेळ शिक्षकांना प्रचलित पद्धतीनुसार रोस्टर प्रमाणे पूर्णवेळ पदावर नियुक्त करण्यात यावे यांसह विविध मागण्या करण्यात आल्या असून सदर मागण्यांचे निवेदन चे निवेदन पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देत राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर यांना देखील निवेदन पाठवण्यात आले आहे.