शिरुर तालुक्यात पुष्पाराज, चंदन चोरांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात पुष्पा राज वाढले असून चंदन चोरीच्या घटनांमध्ये प्रंचड वाढ होत असून, मध्यरात्री ते पहाटेच्या दाट अंधारात चंदनाच्या खोडावर व शेतकऱ्याच्या आर्थिक कण्यावर घाला घातला जात आहे.

शिरुर तालुक्यातील सविंदणे, कवठे येमाई, मलठण, आमदाबाद, टाकळी हाजी, जांबुत, पिंपरखेड या भागात अक्षरश: चंदनचोरांनी उच्छाद मांडला आहे. दिवसा पहाणी करुन रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनाची बहुमुल्य किंमत असलेली झाडे कापून नेली जात असल्याचे व हे चंदनचोर शिक्रापूर भागातून आल्याचे शेतकरी विनायक नरवडे, उद्धवगिरी गोसावी यांनी सांगितले आहे.

हे चंदनचोर संख्येने जास्त व हत्यारबंद असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना रात्रीच्या वेळी अडवण्याचे धाडस होत नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतात अनेक ठिकाणी चंदनाची झाडे आहेत. चंदनाच्या झाडाच्या गाभ्याला चांगला भाव मिळत असल्याने झाडे रात्रीच्या वेळी कापून त्यातील उपयोगी भाग काढून घेऊन चोरी केली जात आहे. चंदनामुळे कमी कष्टात जास्त पैसा मिळू लागल्याने चोर चंदनचोरीकडे मोठया प्रमाणात वळू लागल्याने चंदनचोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान शिरुर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.