शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला तीन दिवसांच्या पाठलागानंतर चाकण येथून ताब्यात घेण्यात आले.
8 जुलै 2021 रोजी बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 78 लाख रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी 9 जुलै 2021 रोजी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते याच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडला त्यावेळी गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक असलेला प्रवीण गवते (वय 22, रा. गवते वस्ती, चाकण, ता. खेड) हा गुन्हा दाखल होताच फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा वारंवार शोध घेतला, मात्र तो सतत ठिकाणे बदलत असल्याने अटकेपासून बचाव करत होता.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. दरम्यान, आरोपी चाकण परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि स्थानिक स्त्रोतांच्या मदतीने तीन दिवस सापळा रचून त्याचा पाठलाग केला. अखेर गवते वस्ती, चाकण येथून त्याला ताब्यात घेण्यात यश आले.
पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या अटकेमुळे गुटखा तस्करीविरोधातील कारवाईला बळ मिळाले असून, आरोपीची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याशी संबंधित आर्थिक व्यवहार तसेच इतर आरोपींच्या नेटवर्कचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह के., अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, सोमनाथ कचरे, पोलीस अंमलदार गणेश येळवंडे, नवनाथ केंद्रे आणि मयूर कुंभार यांच्या पथकाने केली.