सणसवाडीतील नरेश्वर वनराई आगीच्या भास्मस्थानी

शिरूर तालुका

तळीरामांकडून आग लागल्याचा ग्रामस्थांसह वृक्षप्रेमींचा अंदाज

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी ता. शिरुर येथील नरेश्वर मंदिर परिसरात गेली अनेक वर्षांपासून काही वृक्षप्रेमी व ग्रामस्थांकडून हजारो देशी झाडांची लागवड करुन वनराई उभारण्यात आलेली असताना काही समाज कंटक अथवा तळी रामांकडून येथे आग लागल्याने नरेश्वर वनराई आगीच्या भास्मस्थानी पडली आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील नरेश्वर मंदिर परिसरात ग्रामपंचायत, विविध संघटना, कंपन्या, उद्योजक व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून सामाजिक हेतूने विविध देशी झाडांचे वृक्षारोपण करुन सदर झाडांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत वतीने पाणी व पाईप यांची उपलब्धता करण्यात आलेली आहे.

सध्या परिसरात झाडांची संख्या वाढल्याने येथील वनराई मुळे विविध पशु, पक्षांचा अधिवास वाढत चालला आहे, मात्र सध्या या भागात अनेक तळीराम भटकत असतात. नुकतेच येथील वनराईला दुपारच्या सुमारास मोठी आग लागल्याने झाडांसह पक्षांची व घरटी सुद्धा जळून गेली आहेत. दरम्यान आग विझवण्यासाठी वाघोली येथील अग्निशमन दलाचा बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात येण्यास मदत झाली असून सोमनाथ दरेकर यांनी पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला.

सदर विझवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सैद, माजी उपसरपंच सागर दरेकर, पोपट ढेरंगे, मच्छिंद्र हरगुडे, सागर हरगुडे, संतोष दरेकर, नामदेव हरगुडे, संजोग तांबे, ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे, माजी सरपंच रमेश सातपुते, वन विभागाचे कर्मचारी आनंदा हरगुडे यांसह शेजारील कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आगीचे लोळ शेजारील कंपनीकडे जात असताना नागरिकांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण आल्याने अनर्थ टळला मात्र पूर्ण नरेश्वर वनराई आगीच्या भास्मस्थानी गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून समाज कंटक अथवा तळी रामांकडून येथे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.