बैलपोळ्यावर लंपी रोगाचं सावट सणासाठी बैल एकत्र आणण्यास बंदी

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) लंम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैल पोळा सणानिमित्त गावातील बैल एकत्र आणण्यास सरकारने बंदी केली असून आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांनी दोन वर्ष बैलपोळा सण साजरा केला नव्हता. त्यात यावर्षी लंम्पी चर्मरोगामुळे हा सण साजरा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. महाराष्ट्र राज्यात लंपी चर्मरोग हा विषाणूजन्य सांसर्गिक रोग प्रादुर्भाव केवळ गोवंशीय पशुधनात आढळून आलेला आहे. या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने अधिनियमातील अधिसूचनेद्वारे संपूर्ण महाराष्ट्र हे “नियंत्रित क्षेत्र” म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

या अधिसूचनेद्वारे लंपी चर्मरोगाचे नियंत्रण व प्रतिबंधासाठी गुरे म्हशीचा बाजार भरवणे,प्राण्याच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच या पशुधनाच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. ही बाब विचारात घेता बैल पोळा सणानिमित्त गावातील बैल मोठ्‌या प्रमाणात एकत्र येऊन त्यांनी मिरवणूक निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावात लंपी चर्मरोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु होईल. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावात लंम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैलपोळा सणानिमित्त गावातील बैल एकत्र आणण्यास शासनाकडून बंदी करण्यात येत आहे. ग्रामपंचायतने याबाबत नोटिस बोर्ड, फ्लेक्स किंवा दवंडी देऊन सर्व पशुपालक यांना अवगत करण्याचे आवाहन शिरुरचे तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी केले आहे.