शिक्रापूरात एका व्यक्तीला मारहाण करुन लुटणारे तिघे जेरबंद

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथून दुचाकीहून चाललेल्या व्यक्तीला अडवून एका खोलीमध्ये डांबून त्याला मारहाण करुन लुटणाऱ्या तिघांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले असून अक्षय राजू शेडगे, तुषार दशरथ गोरडे व विनायक दामू जिते असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या युवकांची नावे आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्टोन वूड हॉटेल समोरुन बद्रीनाथ थोरवे हे (दि. ८) डिसेंबर रोजी त्यांच्या एम एच १४ एच टी ०७७८ या दुचाकीहून चाललेले असताना एका दुचाकीहून तीन युवक आले त्यांनी थोरवे यांना अडवून जवळील एका बंद खोलीत घेऊन जाऊन मारहाण करुन त्यांच्या जवळील सहा हजार रुपये, मोबाईल, गळ्यातील सोन्याचा आणि दुचाकी घेऊन पोबारा केला होता. याबाबत बद्रीनाथ बबनराव थोरवे (वय ३0) रा. साले गाव ता. शेणगाव जि. हिंगोली यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल केले होते.

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना कोंढापुरी येथे थोरवे यांनी सांगितलेल्या वर्णनाचे दोन युवक रात्रगस्त घालणाऱ्या पोलीस नाईक शिवाजी चीतारे व किशोर शिवणकर यांना दिसून आले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, पोलीस नाईक विकास पाटील, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, पोलीस शिपाई जयराज देवकर, निखील रावडे, किशोर शिवणकर, लखन शिरसकर यांनी सदर ठिकाणी सापळा लावून अक्षय शेडगे व तीषर गोरडे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या विनायक जिते या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले.

दरम्यान पोलिसांनी अक्षय राजू शेडगे (वय २२), तुषार दशरथ गोरडे (वय २७) दोघे रा. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) जि. पुणे व विनायक दामू जिते (वय २९) रा. शिक्षक कॉलनी शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) जि. पुणे या तिघांना जेरबंद केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.