मकरसंक्रांतला पतंग उडवताना पक्षांची काळजी घ्या…

शिरूर तालुका

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे नागरिकांना आवाहन

शिक्रापूर: मकरसंक्रांत दिन साजरा होत असताना अनेक ठिकाणी शाळकरी मुलांसह युवकांमध्ये पतंग उडविण्याचे वेध सुरु होते मात्र पतंग उडवताना प्रत्येकाने पक्षांची काळजी घ्यावी, असे आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख व सचिव अमर गोडांबे यांनी केले आहे.

मकरसंक्रात हा प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला येणारा महत्वाचा सण या सणामध्ये महिला वाण वाटत ऐकामेकांना शुभेच्छा देतात तर लहान मुले व युवक पतंग उडवण्याचा आनंद घेतात मात्र काही ठिकाणी पतंग उडवण्यासाठी चायनीज मांजाचा वापर केला जातो, अनेकदा पतंग झाडांवर अडकल्या नंतर युवक पतंग तसाच झाडावर सोडून देतात.

त्या झाडांवर पतंगाचा मांजा अडकून राहिल्याने कित्येकदा पक्षी त्या मांजांमध्ये अडकण्याचे प्रकार घडून पक्षांना अपंगत्व सुद्धा येते तर काही पक्षांचा जीव देखील जात असतो. त्यामुळे नागरिकांनी पतंग उडवण्याचा आनंद मोकळ्या जागी घ्यावा.

तसेच झाडांवर पतंग अथवा मांजा अडकणार नाही, याची काळजी घेऊन कोठे झाडांवर मांजे अडकले तर ते तातडीने काढून घ्यावे, जेणेकरुन आपल्या देशाची संपत्ती असलेल्या पक्षांना हानी पोहचणार नाही. तसेच कोठे झाडांमध्ये तसेच मांजांमध्ये पक्षी अडकल्याचे आढळून आल्यास वनविभाग अथवा जवळील सर्पमित्र व प्राणीमात्रांना कळविण्याचे आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख व सचिव अमर गोडांबे यांनी केले आहे.