रांजणगाव पोलिसांमुळे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला मिळाला न्याय 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात शहिद झालेले सैनिक अंबादास पवार यांच्या पत्नीकडुन एका बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम करण्यासाठी घेतलेले ३ लाख रुपये तो देण्यास टाळाटाळ करत असल्याने रांजणगाव MIDC पोलिसांनी शहीद सैनिकाच्या पत्नीस हे पैसे मिळविण्यासाठी न्याय मिळवून देण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. सदरची कामगिरी पोलिस हवालदार संदीप जगदाळे यांनी केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहिद सैनिकाची पत्नी श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी कारेगाव (ता. शिरुर) येथे गट नंबर २९८/१ या २ गुंठा क्षेत्रात २ हजार चौरस फुटाचे दोन मजली आर.सी.सी. बांधकाम करायचे ठरविले होते. याबाबत त्यांच्या परिचयाचे प्रकाश हांडे यांनी बांधकाम व्यावसायिक संतोष जगदाळे यांच्याशी त्यांची भेट घालून सदर बांधकाम मटेरियल सहित ४४ लाख ४० हजार रुपयांना करुन देण्याचे ठरले. त्या बदल्यात आगाऊ रक्कम म्हणुन ३ लाख रुपये संतोष जगदाळे यांना देण्यात आली.

त्यानंतर शहिद पत्नी श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी संतोष जगदाळे यांना काम कधी सुरु करता याबाबत फोन केला असता लाँकडाऊन असल्यामुळे कामगार गावाला गेले आहेत. असे उत्तर दिले. त्यानंतर परत पवार यांनी संपर्क साधला असता या ठेकेदाराने काम करण्यासाठी तसेच पैसे देण्यासाठी टाळाटाळ करु लागला होता. संबंधित ठेकेदार संतोष जगदाळे याने मार्च २०२० पासुन काम तर केले नाहीच ऊलट अँडव्हान्स घेऊन ही उडवाउडवीची उत्तरे व टाळाटाळ होत असल्यामुळे शहिद पत्नी श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीसांत अर्थिक फसवणुकीची फिर्याद दिली.

सदर प्रकरण घोडनदी न्यायालयात गेले न्यायालयाने आरोपीने फिर्यादीचे घेतलेले तीन लाख रुपये जप्त करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. त्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी सदर रक्कम जप्त केली. तसेच पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, माणिक काळकुटे, ठाणे अमंलदार राजेश ढगे यांच्या उपस्थितीत ही रक्कम परत करण्यात आली.