शिरुर तालुक्यातील नरेश्वर डोंगरावर आढळल्या दुर्मिळ जातीच्या पाली

शिरूर तालुका

लेपर्ड गेको जातीच्या पाली वन्यजीव प्रेमींच्या निदर्शनास

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील नरेश्वर डोंगरावर (दि. २१) जून रोजी सकाळच्या सुमारास काही सर्पमित्र गेले असता त्यांना दुर्मिळ अशा बिबट्याच्या रंगा सारख्या दिसणाऱ्या दुर्मिळ लेपर्ड गेको जातीच्या पाली आढळून आल्या आहेत.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील नरेश्वर डोंगरावर (दि. २१) जून रोजी सकाळच्या सुमारास सर्पमित्र श्रीकांत भाडळे, सर्पमित्र शेरखान शेख, सर्पमित्र अमोल कुसाळकर हे गेलेले असताना त्यांना एका खडकावर बिबट्याच्या अंगावरील नक्षी प्रमाणे सरपटणारा प्राणी दिसून आला. त्यांनी लगेचच त्याचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेत वन्य जीवांचा जास्त अभ्यास असलेले पुणे येथील सर्पअभ्यासक अमर गोडांबे व शिर्डी येथील संदीप खिरे यांना हे फोटो पाठवले त्यावेळी येथे दिसून आलेल्या पाली दुर्मिळ व बिबट्याच्या रंगा सारख्या दिसणाऱ्या दुर्मिळ लेपर्ड गेको जातीच्या असल्याचे अमर गोडांबे व संदीप खिरे यांनी सांगितले.

यावेळी सर्पमित्रांना मार्गदर्शन करताना डोंगराळ भागात असलेले कीटक, विंचू हे या पालींचे खाद्य असल्यामुळे या पाली डोंगरावरच वास्तव्य करतात. तसेच पुणे जिल्ह्यात अनेक दिवसांपूर्वी बारामती येथे देखील सदर जातीच्या पाली आढळून आलेल्या असल्याचे सर्पअभ्यासक अमर गोडांबे यांनी सांगितले. तर आम्हाला दुर्मिळ जातीच्या पाली प्रत्यक्ष पाहता आल्याचे समाधान मिळाल्याचे सर्पमित्र श्रीकांत भाडळे, शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी सांगितले.