पुणे जिल्ह्यात प्रथमच शिक्षकांचे वेतन ऑनलाईन, कसे बघा…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षकांना देण्यात येणारे वेतन यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने वेतन जमा होण्यास वेळ लागत होता. मात्र सध्या जिल्हा परिषदेने ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन देण्यात सुरवात केली असल्याने शिक्षकांना एकाच वेळी वेतन ,मिळत असताना पुणे जिल्हा परिषदेकडून एकाच वेळी सर्व शिक्षकांना वेतन मिळाले तर प्रथमच असा उपक्रम राबविण्याचा बहुमान देखील पुणे जिल्हा परिषदेने मिळवला आहे.

पुणे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांना वेतन देण्यात नुकतीच सुरुवात केली असल्याने दसरा सणाच्या पूर्वीच वेतन झाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे, पुणे जिल्हा परिषदेने अकरा हजार एकशे पन्नास शिक्षकांचे वेतन ZPFMS प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खात्यावर जिल्हा परिषद स्तरावरुन जमा केले.

सर्वात जास्त संख्येतील शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन राज्यात सर्वात प्रथम हस्तांतरण करणारी जिल्हा परिषद ठरली आहे. मागील महिन्यापासून वेतन वेळेत होत असल्याने सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पुढे दर महिन्याला विनाविलंब वेतन निश्चित होईल, असा विश्वास पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आता या माध्यमातुन आलेला आहे. याबद्दल सर्व शिक्षकांनी व शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मुख्य लेखा वित्त अधिकारी महेश अवताडे व प्राथमिक विभागाच्या जिल्हा शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी जिल्ह्यातील शिक्षकांचा ZPFMS प्रणालीद्वारे वेतन करण्याचा निर्णय घेऊन यापूर्वी दरमहा वेतनास होणारा विलंबाचा प्रश्न कायमचा सोडविला असल्याने यापुढे शिक्षकांची व संघटनांची तक्रार राहणार नसल्याची खात्री मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

सदर वेतन प्रक्रीया पार पाडण्यासाठी शिक्षण विभागातील अधीक्षक हनुमंत कोलगे, कनिष्ठ लेखा अधिकारी विशाल शेलार, कनिष्ठ लेखा सहाय्यक प्रयास वाळद्रा, सुनील मिडगुले यांसह सर्व तालुका शालार्थ समन्वयक यांनी परस्पर समन्वय साधत विशेष परिश्रम घेतले.

गेली दोन महिने ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांचे पगार वेळेवर होत आहे. त्यामुळे शिक्षकांना पतसंस्था, बँका, विमा व इतर हप्ते वेळेत भरणे शक्य होत असल्यामुळे दंडात्मक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत नाही असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनी सांगितले.