shikrapur-malthan-road

Video! शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा! निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनचालक हैराण…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर, ता. १६ नोव्हेंबर २०२६ (तेजस फडके) : शिक्रापूर ते मलठण या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, अद्यापही रस्त्याची अवस्था सुधारण्याऐवजी अधिकच बिकट होत चालली आहे. निकृष्ट दर्जाचे काम, ठेकेदाराचा मनमानी कारभार, कामातील दिरंगाई आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत www.shirurtaluka.com ने सातत्याने आवाज उठवत बातम्यांची मालिका सुरू ठेवली असतानाही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदाराला जाग येत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आले. मात्र, काम सुरू करताना संपूर्ण रस्ताच खोदून ठेवण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसाठी मोठी कसरत बनली आहे. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याऐवजी संपूर्ण रस्ताच खोदून ठेवण्यात आल्याने धुळीचा त्रास, खड्डे, उंच-सखल भाग आणि अपूर्ण काम यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

अनेक अपघात, रात्रीचा प्रवास धोकादायक!
रस्त्याची दुरवस्था आणि अपूर्ण कामामुळे या मार्गावरून प्रवास करताना अनेक अपघात घडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याची अवस्था लक्षात येत नसल्याने वाहनचालकांना अधिक धोका निर्माण होत आहे. शिक्रापूर-मलठण परिसरातील नागरिकांना कामानिमित्त रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. अशा वेळी रस्त्यावरील खोदकाम, खड्डे आणि अपूर्ण कामामुळे अपघाताची भीती कायम असते. त्यातच परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना बिबट्याची भीती आणि दुसरीकडे रस्त्याची दयनीय अवस्था, अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठेकेदाराचा मनमानी कारभार; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का?
रस्त्याचे काम सुरू होऊन अनेक महिने उलटले असतानाही कामाचा दर्जा आणि गती याबाबत समाधानकारक चित्र दिसत नाही. ठेकेदाराकडून कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि वेळेत काम पूर्ण करण्याबाबत गांभीर्य दिसत नसल्याने नागरिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नागरिकांना दररोज होणारा त्रास दिसत असतानाही लोकप्रतिनिधी याबाबत ठोस भूमिका का घेत नाहीत? ठेकेदाराला जाब कोण विचारणार? कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचे या कामाकडे लक्ष आहे की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

ठेकेदाराचे राजकीय कनेक्शन चर्चेत!
या कामातील दिरंगाई आणि कथित निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांमध्ये नाराजी असतानाच संबंधित ठेकेदाराचे एका राजकीय नेत्याशी संबंध असल्याची माहिती परिसरात चर्चिली जात आहे. त्यामुळेच ठेकेदारावर कोणाचा वरदहस्त आहे का आणि त्याच्यावर कारवाई करण्यास संबंधित यंत्रणा टाळाटाळ करत आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अर्थात, या राजकीय संबंधांबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित यंत्रणेने याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.

नेटिझन्सच्या संतप्त प्रतिक्रिया; सोशल मीडियावरही नाराजीचा सूर
शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या दुरवस्थेबाबत www.shirurtaluka.com ने सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर सोशल मीडियावरही नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्याचे काम नेमके कधी पूर्ण होणार, नागरिकांना आणखी किती दिवस त्रास सहन करावा लागणार, कामाच्या दर्जाची तपासणी कोण करणार, असे प्रश्न नेटिझन्सकडून उपस्थित केले जात आहेत. केवळ काम सुरू असल्याचे दाखवून नागरिकांना वेठीस धरण्यापेक्षा ठेकेदाराने प्रत्यक्ष कामाला गती द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी होत आहे. सोशल मीडियावरील या प्रतिक्रियांमधून नागरिकांचा संयम संपत चालल्याचे स्पष्ट होत आहे.

रस्ता पूर्ण होणार तरी कधी? नागरिकांचा सवाल
शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी किती दिवस लागणार, याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेही नाही. फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना अनेक महिने त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, निकृष्ट कामाची चौकशी करावी, ठेकेदाराला कामाच्या दर्जाबाबत जाब विचारावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांची सहनशीलता आता संपत चालली असून, ठेकेदाराने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये. अन्यथा नागरिकांना आंदोलनासारखे कठोर पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही स्थानिक नागरिकांकडून दिला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आता तरी जागे होणार का, की शिक्रापूर-मलठणच्या नागरिकांच्या वाट्याला आणखी काही महिने हालअपेष्टाच येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिक्रापूर-मलठण रस्ता झाला चिखलमय; ठेकेदार कुठंय…

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

शिक्रापूर-मलठण रस्त्याची अवस्था जशीच्या तशी; ठेकेदाराने धरले वेठीस!

शिक्रापूर-मलठण रस्ता नियोजनाच्या अभावामुळे बनलाय मृत्यूचा सापळा!

शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत