बिबटयाच्या हल्ल्याच्या पार्श्वभुमिवर शेतीला दिवसा विज द्या; डॉ. अमोल कोल्हे

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): जुन्नर वनविभाग अंतर्गत येणाऱ्या जुन्नर, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रात बिबट्याचे शेतकऱ्यांवरील वाढलेले हल्ले चिंताजनक आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा असल्याने शेतीला पाणी भरण्यासाठी बिबटयाच्या व विषारी सर्पाच्या भितीने जीव मुठीत धरुन शेतातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे शेतात राबणाऱ्या शेतकरी राजाला भयमुक्त वातावरण उपलब्ध करुन देणे गरजेचे असून शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

शिरुर तालुक्यातील जांबूत येथे महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांत दोन बळी गेल्यानंतर शेतकऱ्यांणी आक्रमक होत शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे. या पाश्र्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव व शिरुर तालुक्‍यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून मानवी वस्तीत शिरुर नागरिकांवर करण्याच्या घटनांमध्ये खूपच वाढ झाली आहे. येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीज पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शेताला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या काळोखात जावे लागते. अशाच वेळी बिबट्यांचे हल्ले होत आहेत. अशा हल्ल्यात आजवर अनेकांचा बळी गेला आहे तर, अनेक जण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे किमान बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्‍यात शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचा निर्णय शासन पातळीवर होणे आवश्यक आहे.

बिबट्यांच्या हल्ल्यात सातत्याने होणारी जिवितहानी लक्षात घेऊन बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या जुन्नर,आंबेगाव व शिरुर तालुक्‍यात शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन महावितरणला स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.