शिरुर विद्याधाम प्रशालेत अवघ्या 32 वर्षांनी भरला दहावी बारावीचा वर्ग…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील विद्याधाम प्रशालेत 1990- 1992 इयत्ता दहावी- बारावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी एका आगळ्या वेगळया अशा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले. 70 ते 89 वयोगटातील गुरुजनांचे बँड व तुतारीच्या गजरात स्वागत केले.

गुरुजनांच्या आगमनाने सारे वातावरण भारावून गेले. फुलांच्या पायघड्यांवरुन शिक्षक येताना प्रत्येकाने नमस्कार करुन त्यांचे स्वागत केले. प्रथम सर्व गुरुजनांना आकर्षक फेटे बांधून त्यांचे पंचारतीने औक्षण केले. या स्वागताने साऱ्या गुरुजनांचे डोळे पाणावले. या निमित्ताने सारे शिक्षक आणि विदयार्थी यांची 32 वर्षांनंतर भेट झाली. हा आगळा वेगळा कार्यक्रम अत्यंत दिमाखदार साजरा झाला. प्रतिनिधिक स्वरुपात काही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या व त्यांच्या चालू असलेल्या सामाजिक कार्याची सर्व विद्यार्थ्यांना माहिती करुन दिली.

सर्वच शिक्षकांनाही भारावून गेल्यासारखेच झाले होते, तर सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटल्याचा आनंद झाला होता. अतिशय नियोजनबद्ध या कार्यक्रमांमध्ये प्रास्ताविक व स्वागत शीतल वाघ हिने केले, तर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तु.म.परदेशी, घ. वा. करंदीकर सर तसेच काही माझी शिक्षक यांचीही भाषणे झाली. दिवंगत गुरुजन वर्ग व काळाच्या पडद्याआड गेलेले काही सवंगडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी काही विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले, त्यात अग्रभागी नावे घेता येतील ती म्हणजे अर्चना तिवाटणे, शितल वाघ, नीता बोरा, सीमा रुणवाल, विशाखा गायकवाड, निर्मला आढाव, स्वाती धडीवाल, योगिनी तांबोळी, संतोष खाबिया, अविनाश ससाणे, शकील खान, प्रशांत शिंदे, मनोज दीक्षित, सुनील इंदलकर, निलेश खाबिया, गोकुळ रुणवाल, महेश सारडा, रवीन बोरा व लहू गायकवाड.

खर तर प्रत्येक जणच आपापल्या व्यवसायात व्यस्त असतानाही हे सामाजिक भान ठेवून विशेष प्रयत्न करुन सर्वांच्या एकत्रीकरणातून प्रत्येकाला जगण्याची नवीन ऊर्जा दिलेली आहे आणि समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे. या कार्यक्रमात योगिनी तांबोळी हिने आभार व्यक्त केले, तर सूत्रसंचालन संतोष खाबिया व रविन बोरा यांनी केले.