शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात अमोल भोसले यांच्या मनमानी कारभाराची चर्चा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

नियमबाह्य नियुक्त्या, एसीचा गैरवापर अन् नागरिकांची आर्थिक पिळवणूक

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः उपअधीक्षक अमोल भोसले यांच्या कार्यशैलीबाबत तक्रारींचा भडिमार सुरू झाला आहे. कार्यालयात चार ‘झिरो’ कर्मचारी भोसले यांनी स्वतःच्या मर्जीनुसार नेमले असून, या कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कोण करतंय, यावर सध्या प्रचंड गूढ निर्माण झालं आहे.

या कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर येत असून, सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. हे सर्व कर्मचारी कोणत्याही अधिकृत आदेशाविना, शासनाच्या मान्यतेशिवाय काम करत असल्यामुळे त्यांची नियुक्ती संपूर्णतः बेकायदेशीर आहे.त्यामुळे शिरूर उपअधीक्षकांवर वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

याशिवाय, भोसले यांनी आपल्या केबिनमध्ये स्वतःसाठी एसी बसवून घेतल्याची माहितीही पुढे आली आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता बसवलेला एसी आणि त्यावर येणाऱ्या लाईट बिलाचा संपूर्ण भार सध्या शासनाच्या खिशातून जात आहे. सरकारी कार्यालयात अशा प्रकारचा खर्च करणे ही सरळसरळ नियमांची पायमल्ली असून, यामुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक आर्थिक ओझं वाढत आहे. तो विनापरवाना एसी कोणत्या खर्चा खर्चातून बसवला याची वरिष्ठांनी माहिती घेऊन तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सामान्य नागरिकांना तासनतास ताटकळत ठेवणाऱ्या या कार्यालयात, दुसरीकडे साहेब मात्र एसीच्या थंडगार हवेत निवांतपणे बसून ‘अमोल सेवा’ करत असल्याचा चित्र दिसत आहेत.

या प्रकरणी तातडीने चौकशी करून भोसले यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शासकीय कार्यालयात बेकायदेशीर नियुक्त्या, लोकांची पिळवणूक आणि सत्तेचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.सरकारच्या डोळ्यांदेखत नियमांचं उघडं उल्लंघन होत असून आता तरी कारवाई होईल का? हे येणारा काळच ठरवणार आहे .