पाबळला रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन

शिरूर तालुका

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथे पाबळ खेड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कोणतीही तसदी घेत नसल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याने येथील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन केले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथे पाबळ खेड पाबळ रस्त्यावर खेड वरुन पाबळ येथे येत असताना पाबळगावात प्रवेश करतानाच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसामुळे पाण्याची डबकी तयार झाली आहे. तसेच सदर रस्त्यालगत मागील वर्षी बांधलेल्या ओढ्यावरील मोरीवर मोठे खड्डे पडले आहेत. पाबळ खेड रस्त्याने मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतूक होत असते शिरुर रांजणगाव MIDC भागातून मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक व प्रवासी गाड्या खेड सेझ येथे जात असतात.

ओढ्यावरील मोरीच्या झालेल्या नित्कृष्ट बांधकामामुळे येथे मोठे खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबीची दखल घेत सरपंच मारुती शेळके, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर, विकास घोडेकर, दादासाहेब घोडेकर, ज्ञानेश्वर झोडगे यांसह ग्रामस्थांनी या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले असून सदर रस्त्याची तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. तर येथील रस्त्याचा भाग खेड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी येथील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घेणार असल्याचे सांगितले.