डॉक्टर दिनी दिवंगत डॉक्टरांच्या कुटुंबियांना दीड लाखाची मदत

शिरूर तालुका

स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचा मृताच्या वारसासाठी अनोखा उपक्रम

शिक्रापूर: राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करत स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एका डॉक्टराच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे करत एका मयत डॉक्टरच्या कुटुंबियांना १ लाख ५१ हजार रुपयांची मदत सुपूर्त करत सामाजिक भान जपले आहे.

unique international school
unique international school

शिक्रापूर (ता. शिरुर) सह पुणे नगर महामार्गावरील प्रत्येक गावामध्ये स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक कार्य केले जात असताना नुकताच सदर सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. यावेळी काही दिवसांपूर्वी डॉ. कमलाकर शिंदे यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय सदर संस्थेने घेत नुकताच दिवंगत डॉ. कमलाकर शिंदे यांच्या कुटुंबियांना एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

यावेळी स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे, उपाध्यक्ष डॉ. रामदास देवखिळे, सचिव डॉ. श्रीअनंता परदेशी, खजिनदार डॉ. गणेश भोसले, डॉ. ज्योती खडे, डॉ. भगवान पवार, डॉ. दिनेश भोर, डॉ. हिरामण तूरकुंडे, नितीन शिंगाडे यांसह आदी उपस्थित होते, तर डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दिवंगत डॉ. कमलाकर शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करत प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. प्रिया पालीमकर व डॉ. आनंद पालीमकर यांच्या हस्ते ज्येष्ठ डॉ. एल. के. कदम यांना स्पंदन भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर यापुढील काळात देखील सामाजिक कामे केली जाणार असल्याचे स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांनी सांगितले.