शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा: जयंत पाटील

शिरूर तालुका
मुंबई: देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच मध्यमवर्गीयांच्या मानगुटीवर बसलेला महागाईचा राक्षस नष्ट व्हावा, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गणरायाला घातले.
कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर आज दोन वर्षानंतर राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन झाले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
आमच्या सरकारने कधीही कोणत्याही सणांवर बंदी आणली नाही. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काही निर्बंध लावले होते. आज कोरोना कमी झाला आहे म्हणून निर्बंध हटवले गेले आहेत. जर एखादा पक्ष या परिस्थितीवर राजकीय पोळी भाजत असेल तर अवघड आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी भाजपचे नाव न घेता टोला लगावला.
विदर्भातील लोकांनी मला सांगितले की अतिवृष्टी झालेल्या भागात कवडीचीही मदत झालेली नाही. सरकारने घोषणा तर केली पण मदत अजून पोहोचली नाही. वेळेवर मदत मिळत नसेल तर त्या मदतीला काय अर्थ? असा संतापही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.