अनाथांना शासकीय योजनांचा लाभ देऊ; प्रवीण कोरगंटीवार

शिरूर तालुका

समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांचे अनाथांसाठी पगारातले पंचवीस हजार

शिक्रापूर (शेरखान शेख): शासनाच्या समाज कल्याण विभागातून नागरिकांसाठी तब्बल तीनशे साठ प्रकारच्या योजना असून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करु, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी केले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेत आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटनप्रसंगी बोलताना पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार बोलत होते. याप्रसंगी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, कात्रज दुध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे, पिंपळे जगतापचे उपसरपंच कुणाल बेंडभर, रील्स स्टार आण्णा भंडारे, अजय पोटे, प्रवीण बोरसे, अशोक शेळके, पिंटू बावनेर, नरेंद्र भोसले, वढू बुद्रुकचे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय भंडारे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये भरपूर निधी शिल्लक आहे. माहेर संस्थेतील मुलांना तसेच संस्थेला कोणत्या योजनेचा लाभ देता येईल याबाबत मी तपासणी करतो, आपण देखील त्याबाबत प्रस्ताव सादर करावा, जिल्हा परिषदेकडून काही शक्य न झाल्यास राज्य शासनाकडे पाठपुरावा करु असे देखील यावेळी समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी करत माहेर संस्थेच्या कार्याचा गौरव करत माहेर मधील अनाथ मुलांसाठी स्वतःच्या पगारातील 25 हजार रुपयांची मदत देऊ केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश पोळ यांनी केले तर प्रास्ताविक रमेश दुतोंडे यांनी केले आणि माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी आभार मानले.