शिक्रापूर (शेरखान शेख): आपटी (ता. शिरुर) येथे घराला बाहेतून कडी लावून शेजारील घरातील सव्वा लाख रुपये रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल 4 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आपटी (ता. शिरुर) येथील सुरज शिवले व सर्वजण रात्रीच्या सुमारास घरात झोपले होते. पहाटेच्या सुमारास सुरजचे वडील पोपट शिवले यांना शेतातील कामासाठी जायचे असल्याने ते घराची कडी उघडत बाहेरुन कडी लावलेली होती. त्यामुळे सुरज याने घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेल्या त्याचा भाऊ सचिन याला फोन करुन बाहेरील कडी उघडण्यास सांगितली.
त्यावेळी सचिन खाली कडी उघडण्यास आला असता त्याला शेजारील घराच्या दरवाजाची कडी तुटलेली दिसली. त्यामुळे सर्वांनी त्या घरात आत जाऊन पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्थ असल्याचे दिसले. त्यामुळे घरात पाहणी केली असता घरातील सव्वा लाख रुपये तसेच 8 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह काही चांदीचे दागिने असा अंदाजे चार लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत सुरज पोपट शिवले (वय २७) रा. आपटी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.