जातेगाव खुर्दमध्ये शिकारीच बनला शिकार

शिरूर तालुका

नागाने गिळला चक्क चारफुटी विषारी घोणस साप

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे शिकारीच्या शोधात असलेल्या घोणस सापाचीच एका नागाने शिकार केल्याची घटना घडली. मात्र यावेळी घोणस सापाचा मृत्यू झाला असून नागाला सर्पमित्रांकडून जीवदान देण्यात आले आहे.

जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे उल्हास जगताप यांच्या घरासमोर भलामोठा नाग एका अजगरा ससारख्या एका सापाला गिळत असल्याने दोन्ही सापांची झटापट सुरु असल्याने नागरिकांना दिसले. त्यांनी याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली असता निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता साडेपाच फुटी नागाने घोणस सापाला गिळून नागरिकांची चाहूल लागल्याने पुन्हा गिळलेला साप बाहेर सोडत असल्याचे दिसून आले. काही वेळात नागाने पूर्ण साप बाहेर काढून घरात घुसला.

दरम्यान शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी तातडीने सदर नागाला शिताफीने पकडले, यावेळी उल्हास जगताप, पोलीस पाटील कृष्णा गाजरे, रवींद्र वाघचौरे यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान याबाबतची माहिती वनपाल गौरी हिंगणे व वनरक्षक बबन दहातोंडे यांना देत नागाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.