करडे परीसरात मध्यरात्री जाळला जातोय क्रॅप मधील अनावश्यक कचरा…

आरोग्य मुख्य बातम्या

शिंदोडी (तेजस फडके) करडे-रांजणगाव गणपती अष्टविनायक महामार्गाच्या कडेला पडीक जमिनीत रात्रीच्या वेळेस भंगारा (क्रॅप) मधील अनावश्यक कचरा जाळला जात असुन त्या कचऱ्यामधुन निघणाऱ्या धुरामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

करडे येथुन रांजणगाव गणपती येथे अष्टविनायक महामार्ग जातो. त्या महामार्गाच्या कडेला (दि 23) रोजी रात्री 9 च्या सुमारास भंगारा (क्रॅप) मधील अनावश्यक कचरा जाळण्यात आला. हा कचरा जाळत असताना प्रचंड मोठया प्रमाणात धुराचे लोट आजूबाजूच्या परीसरात दिसत होते. या धुरामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस कचरा जाळणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी जागरुक नागरिकांनी केली आहे.

 

करडे एमआयडीसी मुळे बकालपणा वाढण्याची शक्यता…

रांजणगाव येथे आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असुन करडे येथे रांजणगाव औद्योगिक वसाहतीचा टप्पा क्रं 3 चे काम सुरु आहे. या औद्योगिक वसाहतीत स्थानिक लोकांचे वेगवेगळे ठेके असुन त्यात ज्या लोकांचे भंगाराचे (क्रॅप) ठेके आहेत. तेच लोक रात्रीच्या वेळेस भंगारातील (क्रॅप) अनावश्यक कचरा जाळण्याचे उद्योग करत आहेत.

 

करडे येथील ग्रामसेवक एल डी जगदाळे यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले रात्रीच्या वेळेस कचरा जाळला जात असल्याबाबत मला काहीही कल्पना नाही. याबाबत माहिती घेऊन सांगतो.