शिक्रापूरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अवजड वाहन चालकांकडून केराची टोपली

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रस्त्यावर होणारी वाहतुकोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ठराविक वेळेत अवजड वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा अवजड वाहतूक बंदच्या वेळेमध्ये देखील रस्त्यावर अवजड वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीत भर पडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने येथील वाहतूक कोंडी सोडवण्याची तसेच वाहतूक कोंडी बाबत उपाययोजना करण्याची मागणी होत असताना शिक्रापूर हद्दीमध्ये पुणे नगर तसेच शिक्रापूर चाकण रस्त्याने सकाळी 7 ते 10 तसेच सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजे पर्यंत अवजड वाहनांना बंदी घातल्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयास दिले.

त्याबाबत प्रसिद्धी देखील पोलिसांकडून करण्यात आली. मात्र आदेश येताच दुसऱ्या दिवशी सकाळ पासून वाहनांच्या तब्बल 10 ते 15 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या तसेच आज देखील सकाळ पासूनच शिक्रापूर चाकण तसेच पुणे नगर रस्त्यावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश फोल गेल्याचे दिसून आले असून पोलीस प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकर सुटेल; हेमंत शेडगे

सध्या ज्या ठिकाणी अवजड वाहनांची पार्किंग करण्याचे नियोजन केले होते. त्या ठिकाणी पावसामुळे पूर्ण चिखल झाला असून तेथे वाहने लावण्यास अडचण येत आहे. तसेच तळेगाव येथून महामार्गाला जोडणारा पर्यायी रस्ता पावसाने वाहून गेला होता. सदर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच सदर रस्ता सुरु होईल व वाहतूक कोंडीला आळा बसेल असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.