शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी येथे सध्या शेतीच्या नावाखाली बेकायदेशीर मातीउपसा चालु असुन याबाबत महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर तलाठी व पोलिसांनी शिंदोडी येथे भेट दिली. परंतु प्रशासनाची लोक पाठमोरे होताच मस्तवाल झालेल्या मातीचोरांनी बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु केला. त्यामुळे मातीचोरांना कुणाचीही भीती राहीली नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

 

सध्या घोड धरणात पाणी पातळी कमी झाल्याने धरणातील काळी माती शेतात टाकण्यासाठी चढाओढ सुरु झाली असुन पैशाच्या हव्यासापोटी शासनाचे नियम पायदळी तुडवत मातीचोर रात्रंदिवस नदीपात्रातुन बेकायदेशीर माती उपसा करत आहेत. परंतु माती वाहतुक करणाऱ्या वाहनांमुळे एखादा गंभीर अपघात झाल्यास याला नक्की जबाबदार कोण…? असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत.

 

माती वाहतुक करणाऱ्या विना नंबरच्या ट्रॉली…

सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. शिंदोडी येथे मातीवाहतुक करणाऱ्या बहुतांशी ट्रॅक्टर तसेच ट्रालीला नंबरचं नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात जर एखादा अपघात झाल्यास पोलिस नक्की कुणावर कारवाई करणार…? असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

माती वाहतुक करणाऱ्या वाहनांची कागदपत्र तपासणी महत्वाची 

शिंदोडी येथील घोड धरणातुन माती वाहतुक करणाऱ्या जेसीबीसह ट्रॅक्टर तसेच ट्रॉली यांच्या कागदपत्रांची योग्य तपासणी होणे गरजेचे असुन एखादा गंभीर अपघात झाल्यावर पोलिस प्रशासन  जागे होणार कां…? शिरुर तालुक्यात अनेक अल्पवयीन युवक ट्रॅक्टर, जेसीबी तसेच हायवा सारखी अवजड वाहने चालवत असुन त्यांच्याकडे हि वाहने चालविण्याचा रीतसर परवाना आहे कां याची तपासणी होणे गरजेचे आहे.

महसूल व पोलिस प्रशासन ‘सायलेंट’ मोडवर …?

शिरुर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासुन चिंचणी येथे बेसुमार वाळू उपसा चालु आहे. काही राजकीय पुढाऱ्यांचे कार्यकर्ते चिंचणी येथील घोड धरणातुन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून बेकायदेशीर वाळू उपसा करत आहेत. मात्र महसूल विभाग आणि पोलिस मात्र फक्त बघ्याची भुमिका घेत आहेत. तसेच शिंदोडी येथे सध्या बेकायदेशीर माती उपसा चालु आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर महसूल व पोलिस यांनी शिंदोडी येथे भेट दिली. मात्र कोणावरच कारवाई केली नाही. त्यामुळे महसूल व पोलिस प्रशासन ‘सायलेंट’ मोडवर असुन ते ‘ऍक्शन’ मोडमध्ये कधी येणार तसेच महसूल व पोलिस यांना वाळूमाफिया आणि मातीचोर यांनी ‘लक्ष्मीदर्शन’ दिल्यानेच कारवाई होत नसल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या