नवनाथ दौंडकर यांनी मिळवली गणित विषयातील डॉक्टरेट पदवी

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे सालकरी कै. आमदार बाबुराव दौंडकर यांच्या करंजावणे गावाचे सुपुत्र नवनाथ बाळासाहेब दौंडकर या युवकाने वयाच्या अवघ्या २९ वर्षी दि २३ जुलै २०२२ रोजी चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट चेन्नई (तमिळनाडू) येथे गणितातील अल्जेब्रीक टोपोलॉजी या विषयामध्ये चार प्रकारचे प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. नवनाथ हे करंजावणे गावातील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब सबाजी दौंडकर यांचे धाकटे चिरंजीव तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत दौंडकर यांचे बंधू आहेत.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

डॉ. नवनाथ दौंडकर यांनी खूपच खडतर परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले असुन त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण “एकता विद्यालय, करंजावणे” या ठिकाणी पूर्ण केले. त्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेत ८५% गुण मिळाले होते. त्यानंतर त्यांनी शिक्रापुर येथील विद्याधम प्रश्नाला येथे ११ वी १२ वीचे शिक्षण पुर्ण करत असताना बारावी मध्ये ८१% गुण मिळाले होते. तसेच पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात
बीएससी मॅथेमॅटिक्स करत असताना बीएससी मध्ये ८७% गुण मिळवले. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे एमएस्सी मॅथेमॅटिक्स करत असताना एमएस्सी मध्ये ८०% गुण मिळवले. हे करत असतानाच त्यांनी नेट व सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या.

तेव्हाच त्यांनी भारत देशाचे प्रतिनिधित्व करताना पुणे विद्यापीठामार्फत इरान या ठिकाणी जागतिक मॅथेमॅटिकल ऑलंपियाड परिषदेमध्ये जगातील १९२ देशांमधून ४ था क्रमांक मिळविला. त्यानंतर ते चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट चेन्नई (तमिळनाडू) या ठिकाणी गणित विषयातील पीएचडी करण्यासाठी गेले आणि दि २३ जुलै २०२२ रोजी त्यांना गणित विषयातील अल्जेब्रिक टोपोलॉजी या विषयामध्ये प्रबंध सादर केल्यामुळे डॉक्टरेट पदवी बहाल केली गेली आहे. हे यश त्यांनी फक्त वयाच्या २९ व्या वर्षीच संपादन केले असल्याने सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डॉ. नवनाथ दौंडकर यांचे बालपण खूपच हलाखीच्या परिस्थितीमध्ये गेले. १० वी पर्यंत फक्त एकच चप्पल आणि शाळेचे दोन गणवेश घालून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांचे मोठे बंधू प्रशांत दौंडकर हेदेखील उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना खूप प्रोत्साहन द्यायचे. तसेच पैशाच्या बाबतीत कसल्याही प्रकारची काळजी करू नकोस मी तुला काहीच कमी पडुन देणार नाही. असा विश्वास ते नवनाथ यांना देत असल्याने डॉ. नवनाथ हे त्यांच्या यशाचे श्रेय जिद्द, चिकाटी, मेहनती बरोबरच आपले मोठे बंधू प्रशांत यांनाही देतात.

नुकतीच पोस्ट डॉक्टरल फेलोसाठी म्हणजेच पोस्ट डॉक्टरेटसाठी त्यांची आयआयटी मुंबई (पवई) या ठिकाणी त्यांची निवड झाली असुन परदेशातील पोस्ट डॉक्टरेटचे रिझल्ट येणे बाकी आहे असे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.