चक्क रस्त्यावर मैला मिश्रित पाण्याचे तळे साचून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गटार लाईनचे पाणी मुख्य रस्त्यावरून बाजार मैदानासह आजूबाजूच्या नागरिकांच्या घरासमोर साचल्याने येथे मैला मिश्रित पाण्याचे तळे साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील अनेक समस्या वारंवार चव्हाट्यावर येत असताना नुकतेच गावातील गटार लाईन मधूचे मैला मिश्रित पाणी अचानक रस्त्यावर येऊन बाजार मैदानाच्या परिसरात साचले गेले दरम्यान रस्त्यावरच या मैला मिश्रित पाण्याचे तळे साचले जाऊन परिसरात दुर्गंधी पसरली गेल्याने नागरिक देखील हैराण झाले.

मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात गटारचे पाणी येऊन देखील ग्रामपंचायत प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून आले, तर सायंकाळच्या सुमारास तर अक्षरशः रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्या प्रमाणे तळे निर्माण झाले होते, तर या मैला मिश्रित पाण्या सह परिसरात पसरलेल्या दुर्गंधी मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून ग्रामपंचायतने येथील या मैला मिश्रित पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे.

गावातील पूर्वीच्या गटार लाईन सदर ठिकाणी आणलेल्या होत्या. त्यानंतर नवीन लाईनचे देखील पाणी त्या लाईनला सोडल्याने जास्त गटार लाईनला दाब आल्याने गटारचे पाणी रस्त्यावर आलेले आहे. मात्र आम्ही पाण्याच्या टँकर बोलावून सर्व गटार लाईन व रस्ता धुवून घेणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी सांगितले.