नविन कामगार कायदे सर्वांच्या धोक्याचे: यशवंत भोसले

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या सरकार कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करत असून कामगारांना अंधारात ठेऊन राज्यकर्त्यांना हवे त्या पद्धतीने कायदे बनवण्यात आले लवकरच हे कायदे सरकार चालू करण्याच्या मार्गावर असून नवीन कामगार कायदे कामगारांसह शेतकरी, व्यापारी यांच्या धोक्याचे असल्याचे मत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी व्यक्त केले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे समन्वयक सुशांत इनामदार, शिरुर तालुकाध्यक्ष रेवणनाथ गायकवाड, जातेगावचे माजी सरपंच समाधान डोके, नितीन दरेकर, दिनेश पाटील, मधुकर भुजबळ, अमोल कुंभार, सोमनाथ गायकवाड, अमोल घोरपडे, दिपक पाटील, साहेबराव घोरपडे, विलास ठोंबरे, केतन दरेकर, सतीश तरडे यांसह आदी पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

यावेळी बोलताना सध्याच्या बदलणाऱ्या कामगार कायद्यामुळे कायमस्वरुपी कामगारांना देखील कंपनी हवे तेव्हा कामावरून कमी करु शकते, 300 पेक्षा कमी कामगार संख्या असलेले कारखाने कारखानदार कारखाने कधीही बंद करु शकतात. त्यासाठी त्यांना शासनाच्या परवानगीची गरज नाही असे नवीन कायदे येऊ पाहत आहेत. कोरोनाचा फायदा घेत अनेक कामगारांना देशोधडीला लावण्याच्या घटना घडल्या आहेत, शेकडो कामगार कारखान्यात मयत झाले. मात्र एकाही मालकावर गुन्हा नाही.

सध्या ऑनलाईनच्या काळामध्ये नागरिकांना ऑनलाईन खरेदीची सवय लावण्यात येत असल्याने लहान लहान उद्योग बुडू लागले परंतु काही वर्षांनी हेच ऑनलाईन विक्रीतील वस्तू महाग करण्याचा यांचा प्रयत्न आहे. सध्याचे सरकार कामगारांच्या हिताचे नसून उद्योगपतींच्या हिताचे आहेत.

कामगारांच्या मतावर सरकार निर्माण होत असते. मात्र कामगारांना वाऱ्यावर सोडण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचे देखील यशवंत भोसले यांनी सांगत कोणत्याही परिस्थितीत मी कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि कामगारांचे नुकसान होऊ देणार नाही, असा इशारा देखील सरकारला दिला आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश झांजे यांनी केले, तर आभार शिरुर तालुकाध्यक्ष रेवणनाथ गायकवाड यांनी मानले.