शिक्रापुरात शेतकऱ्याच्या शेतात लोंबू लागल्या विजेच्या तारा…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील नागरिकांच्या विजेबाबतच्या अनेक समस्या निर्माण होत असताना आता चक्क शेतकऱ्यांच्या शेतात विजेच्या तारा लोंबकळत असल्याने शेतात दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने येथील तारा पूर्ववत करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकणरोड लगत संतोष जकाते यांची शेती असून सध्या झालेल्या पावसामुळे जकाते यांच्या शेतातील विजेच्या तारा चक्क खाली येत जमिनीला टेकण्याची वेळ आली आहे. सदर तारांमुळे जकाते यांना शेतातील कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होऊन शेतातील कामे करणे जिकरीचे झाले आहे.

तसेच चाकण रोड चव्हाण वस्ती येथील काकासाहेब चव्हाण यांच्या घरासमोर असलेल्या रस्त्यावरील तारा खाली आल्याने अवजड वाहने रस्त्याने जात असताना वाहनांना तारा घासत आहेत त्यामुळे येथे देखील दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील अपघात तसेच दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत वितरणने येथील तारा पूर्ववत करण्याची मागणी उद्योजक गणेश चव्हाण व शेतकरी संतोष जकाते यांनी केली आहे.

तारांची दुरुस्ती केली जाईल: नितीन महाजन

शिक्रापूर येथील जकाते यांच्या शेतातील विजेच्या तारा कामगारांच्या माध्यमातून तातडीने दुरुस्त केल्या जातील तसेच चव्हाण वस्ती येथील रस्त्याचे काम झाल्याने तारांची उंची कमी झाल्याचे विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले