कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतील विषारी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून देत असल्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवसांसाठी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) बंद ठेवण्याचे आदेश एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले आहेत. त्यामुळे या कंपनी विरोधात पाच गावच्या ग्रामस्थांनी (दि २८) ऑगस्ट रोजी पुकारलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) निमगाव भोगी, आण्णापुर, रामलिंग, कर्डीलवाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरुर-ग्रामीण, ढोकसांगवी या गावातील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेलचे पाणी पुर्णपणे दुषित झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) हि कंपनी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी याविरोधात २८ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे-नगर महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु आता या आदेशामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीत विविध कंपनीतील घातक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. यासाठी नियमावली आहे. मात्र गेली अनेक वर्षांपासुन ही कंपनी नियमांचे उल्लंघन करुन चुकीच्या प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे. निमगाव भोगी, आण्णापुर, रामलिंग, कर्डीलवाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरुर-ग्रामीण, ढोकसांगवी या गावातील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेलचे पाणी पुर्णपणे दुषित झालेले आहे. तसेच या गावातील जमिनी नापीक झाल्या आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील खराब झाले आहे.
यामुळे या गावातील नागरिक अनेक आजारांना बळी पडत आहेत.याची शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीने गंभीर दखल घेऊन (दि २८) रोजी या कंपनी विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज (दि २६) रोजी पुणे येथील एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात शिरुर ग्रामीण सह सरदवाडी, कर्डेलवाडी,रांजणगाव गणपती, कारेगाव, अण्णापुर, ढोकसांगवी, निमगाव भोगी, तसेच फलके मळा आदी गावचे ग्रामस्थ, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच पोलीस विभागाचे अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली.
या बैठकीत ग्रामस्थांनी एम ई पी एल कंपनी कायमची बंद करावी तसेच त्यांना देण्यात येणारे वाढीव 52 एकर क्षेत्र रद्द करावे अशी मागणी केली. यावर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी कंपनीकडून अटी व शर्ती भंग झाल्याचे निदर्शनास आल्याचा तसेच वाढीव क्षेत्र कंपनीला देऊ नये असा अहवाल तात्काळ वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल असे बैठकीत सांगितले. तसेच MEPL कंपनी बाहेर सोडत असलेले पाणी दूषित आढळल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
या सर्व प्रक्रियेसाठी वेळ लागणार असल्याने प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत कंपनी १० ते १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश बारवकर यांनी दिले. यावेळी कंपनीचे अधिकारी आसिफ हुसेन यांनी ही कंपनी बंद ठेवण्याचे मान्य केले. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी चंद्रकांत साळुंखे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, माजी जिल्हा परीषद सदस्य शेखर पाचुंदकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मीकराव कुरुंदळे, पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब सरोदे, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, शिरुर ग्रामीणचे उपसरपंच बाबाजी वर्पे, माजी सरपंच अरुण घावटे विठ्ठल घावटे, माजी नगरसेवक विठ्ठल पवार, यशवंत पाचंगे, गणेश सरोदे, प्रकाश थोरात, गणेश कर्डिले, संतोष कर्डिले, अंकुश इचके, संजय पावशे, सचिन सांबारे, किरण झंजाड, उत्तम व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान बारवकर यांनी दिलेल्या या आदेशामुळे (दि २८) ऑगस्ट रोजी नियोजित कंपनी विरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी जाहीर केले.कंपनीच्या प्रदूषणामुळे आसपासची तसेच पंचक्रोशीतील गावातील जमीन तसेच पाण्याची वाताहात झाली असून ही कंपनी जोपर्यंत कायमची बंद होत नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार,आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार उपसरपंच वर्पे यांनी यावेळी ग्रामस्थांच्या साक्षीने केला.
शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर
शिरुर पोलिसांची दहा इलेव्हन कॅफे वर धडक कारवाई, मुला-मुलींचे अश्लील वर्तन; कॅफे चालकावर गुन्हा दाखल