शिरुर (तेजस फडके): वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडलेल्या एका गंभीर घटनेने वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव, मानवता आणि परस्पर समन्वयाचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ‘आनंद हॉस्पिटल’ आणि ‘वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे केलेल्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले.
दौंड तालुक्यातील कानगाव येथील रहिवासी रमेश जयसिंग मोरे हे उपचारासाठी मांडवगण फराटा येथील आनंद हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी अचानक त्यांना चक्कर आल्याने काही क्षणांतच ते बेशुद्ध पडून खाली कोसळले. क्षणाचाही विलंब झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेत डॉ अतुल सुराणा यांनी रुग्णाची हालचाल बंद झाल्याचे आणि प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच त्वरित सीपीआर अर्थात (कार्डिओपल्मनरी रिससिटेशन) देण्यास सुरुवात केली. रुग्णाचे हृदय आणि श्वसनक्रिया पुन्हा सुरु करण्यासाठी डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
त्यामुळे वेळेवर सुरु करण्यात आलेल्या सीपीआरमुळे रुग्णाला पुढील उपचारांसाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा वेळ मिळाला. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची धावपळ, उपचारासाठी सुरु असलेले प्रयत्न आणि गंभीर परिस्थितीतील प्रसंगावधान आनंद हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
त्यानंतर रुग्णाला अधिक प्रगत आपत्कालीन उपचार, कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि अतिदक्षता विभागाची गरज असल्याने त्यांना तातडीने मांडवगण फराटा येथील वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पूर्वसूचनेमुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज…
या रुग्णाला हलवण्यापूर्वीच संतोष इनामदार यांनी वरद विनायक हॉस्पिटलमधील डॉक्टरांना फोनद्वारे रुग्णाच्या गंभीर प्रकृतीची माहिती दिली. त्यामुळे डॉ मनोज भोसले आणि डॉ सुनील पवार यांनी रुग्ण रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच आपत्कालीन उपचार कक्ष, व्हेंटिलेटर, जीवनरक्षक औषधे आणि वैद्यकीय पथक सज्ज ठेवले. रुग्ण वरद विनायक हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याची स्थिती अत्यंत चिंताजनक होती. रुग्णाचा रक्तदाब नोंदवता येत नव्हता, नैसर्गिक श्वसनक्रिया बंद होती आणि ईसीजीवर हृदयाची हालचाल दिसत नव्हती. अशी परिस्थिती पाहूनही डॉक्टरांनी हार मानली नाही.
४५ मिनिटे अखंड सीपीआर…
डॉ भोसले आणि डॉ सुनील पवार आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने रुग्णावर पुन्हा सीपीआर सुरु केला. अंबू बॅगच्या सहाय्याने कृत्रिम श्वसन देण्यात आले. त्याचबरोबर जीवनरक्षक इंजेक्शन्स, आवश्यक औषधोपचार आणि हृदयाची क्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी वैद्यकीय उपचार अखंडपणे करण्यात आले. एक-दोन मिनिटे नव्हे, तर जवळपास ४५ मिनिटे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रुग्णाला वाचवण्यासाठी झुंज सुरू होती. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. रुग्णाच्या नातेवाइकांसाठी हा काळ अत्यंत तणावपूर्ण होता; मात्र डॉक्टरांनी प्रयत्न सोडले नाहीत.
अखेर पाऊण तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रुग्णाच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. त्यानंतर औषधोपचारांच्या मदतीने रक्तदाब नियंत्रित करण्यात आला आणि रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. जवळपास दोन तासांच्या उपचारांनंतर रुग्णाची प्रकृती पुढील प्रवासासाठी स्थिर करण्यात डॉक्टरांना यश आले.
पुढील उपचारासाठी बारामतीला हलवले…
रुग्णाच्या हृदयाशी संबंधित पुढील विशेष उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना सुसज्ज रुग्णवाहिकेतून बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांच्या हृदयावर आवश्यक उपचार यशस्वीरीत्या करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, उपचारांना रुग्णाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांचा व्हेंटिलेटरचा आधारही काढण्यात आला आहे. ते आता स्वतः नैसर्गिकरीत्या श्वास घेत आहेत. मृत्यूच्या दारातून आपल्या कुटुंबातील व्यक्ती सुरक्षित परत येत असल्याचे पाहून मोरे कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
डॉक्टरांसह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे योगदान…
या संपूर्ण उपचार प्रक्रियेत आनंद हॉस्पिटलचे डॉ अतुल सुराणा, वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ मनोज भोसले, डॉ सुनील पवार, डॉ फडके, तसेच दोन्ही रुग्णालयांतील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एका रुग्णालयात तातडीने सुरु करण्यात आलेला सीपीआर, दुसऱ्या रुग्णालयाला देण्यात आलेली पूर्वसूचना, रुग्ण पोहोचण्यापूर्वी सज्ज ठेवलेली आपत्कालीन यंत्रणा आणि डॉक्टरांनी सातत्याने केलेले उपचार यामुळेच रुग्णाचा जीव वाचवणे शक्य झाले.
‘रुग्ण बरा होऊन घरी जाणे हेच आमचे समाधान’…
या घटनेबाबत बोलताना डॉ मनोज भोसले आणि डॉ सुनील पवार म्हणाले,“आम्ही मागील दहा वर्षांपासून परिसरात आपत्कालीन वैद्यकीय सेवा देत आहोत. रुग्ण कोणत्या रुग्णालयातून आला किंवा त्याच्यावर यापूर्वी कुठे उपचार झाले, यापेक्षा त्याचा जीव वाचणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण उपचारांनंतर ठणठणीत बरा होऊन घरी गेला, तर त्यापेक्षा मोठे समाधान डॉक्टरांसाठी दुसरे कोणतेही नसते.”
ग्रामीण आरोग्यसेवेची मान उंचावली…
ग्रामीण भागात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तातडीचे उपचार उपलब्ध नसल्याची अनेकदा चर्चा केली जाते. मात्र, मांडवगण फराटा येथील या घटनेने ग्रामीण भागातील डॉक्टरांची क्षमता, तत्परता आणि आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. हृदयविकाराचा झटका अथवा अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास सुरुवातीच्या काही मिनिटांत सीपीआर मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या प्रकरणात डॉ. अतुल सुराणा यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि त्यानंतर वरद विनायक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलेले अथक उपचार रुग्णासाठी जीवनदायी ठरले. रुग्णाचा जीव वाचवण्याची वेळ आली तेव्हा दोन रुग्णालयांमधील व्यावसायिक सीमा पूर्णपणे विरघळल्या आणि केवळ सेवाभाव, समन्वय व मानवता उरली. “डॉक्टरांची खरी स्पर्धा एकमेकांशी नव्हे, तर मृत्यूशी असते,” हा संदेश या घटनेतून प्रभावीपणे पुढे आला आहे.