eknath-maharaj-dindi-sohala

एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे पैठणकडे प्रस्थान!

शिरूर तालुका

खंडाळेः श्री भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे या संस्थेच्या माध्यमातून एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे शुक्रवारी (ता. ३) पैठणकडे प्रस्थान झाले आहे, अशी माहिती श्री भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प. संतोष महाराज खेडकर यांनी दिली.

एकनाथ महाराजांचा पालखी रथ दिंडी सोहळ्यानिमित्त आकर्षक असा सजवण्यात आला होता. पालखीचे उंड, घोडे, बैलगाडी, वाजंत्री, फटाके तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात पैठणकडे प्रस्थान करण्यात आले. यावेळी खंडाळे (ता. शिरूर, जि. पुणे) परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडी सोहळा प्रस्थानासाठी व नियोजनासाठी खंडाळे, पिंपरी दुमाला, वाघाळे, गणेगाव खालसा, बुरुंजवाडी, कोंढापुरी, रांजणगाव गणपती परिसरातील वारकरी एकत्र आले होते. श्री भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प. संतोष महाराज खेडकर व अध्यक्ष ह.भ.प. दादा महाराज नरवडे यांनी स्वागत केले.

पुणे जिल्ह्यातून एकनाथ षष्टीसाठी जाणारी हा पहिला पायी दिंडी सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. एकूण १२ दिवसांचा मुक्काम असणार आहे, असे संतोष महाराज यांनी सांगितले. पालखी सोहळ्याच्या रथाचे पुजन ह.भ.प. नानासाहेब पाचुंदकर यांनी केले. गहिनीनाथ नरवडे यांनी स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या व रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर, शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य विक्रम दादा पाचुंदकर, नानासाहेब दिनकर पाचुंदकर पाटील, खंडाळे गावचे सरपंच ज्योतीताई मारुती नरवडे, उपसरपंच अमोल रामचंद्र नरवडे आणि मान्यवर उपस्थित होते.