वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र लहानू थोरात यांचे आज (सोमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गावामध्ये आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मच्छिंद्र थोरात यांनी मोठ्या कष्टातून संसार उभा केला होता. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. अतिषय नम्र असलेले आप्पा या नावाने गावात त्यांची ओळख होती. कधीही ते कोणावर मोठ्याने ओरडले अथवा चिडल्याचे ऐकवात नाही. वाघाळे गावामध्येच ते लहानाचे मोठे झाले. शेवट पर्यंत त्यांनी शेती केली. आजच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पाहायला मिळत नाही. परंतु, त्यांनी कुटुंब जोडून ठेवण्याचे संस्कार मुलांवर केले होते. एक आदर्श पती, पिता कसा आसावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी पंचक्रोशीतील नागरिकांना दाखवून दिले होते.
पहाडी आवाज, मोठी उंची, धोतर आणि पांढरी शुभ्र टोपी असा त्यांचा पेहराव होता. कुटुंब अथवा मुलांच्या मित्रांची मैफल बसल्यानंतर अनेक जुन्या आठणींना ते उजाळा देत. त्यांच्याकडे आठवणींचा मोठा खजीना होता. त्यांच्या जाण्यामुळे कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरली आहे. व्यावसायिक संदीप थोरात आणि विकास सोसायटीचे चेअरमन दिलीप थोरात हे त्यांचे पुत्र होत.