शिरुर तालुक्यात बिबटयाचे पशुधनावर हल्ले सुरुच

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील पश्चिमेकडील कामठेवाडीमध्ये शेतकरी रविंद्र पुंडे यांच्या शेतीमध्ये मेंढपाळ सुभाष कोकरे रा. ढवळपुरी यांचा वाडा बसला असता रात्री १ ते २ दरम्यान वाड्यावरील बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे.

मेंढपाळ कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने जागे झाले व त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथुन एका बकराचा फडशा पाडुन पलायन केले. या परीसरातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तात्काळ वन विभागाने सदर ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.

सदरील घटनेच्या दोन दिवस अगोदर किसन कामठे आणि अप्पा पडवळ यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. सदरच्या घटनेची माहिती अमोल कामठे यांनी स्थानिक ग्रा. सदस्या नंदा पुंडे यांना दिल्यानंतर त्यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधुन या भागात वारंवार बिबट्याचे हल्ले लक्षात घेता पशुधनाचा पंचनामा करुन वनविभागाने योग्य उपाययोजना करुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.