आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय…!

महाराष्ट्र

मुंबई (शितल करदेकर): आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती असल्याने पुरुषी वर्चस्व आहे आणि त्यामुळे महिलांना कितीही समान अधिकार मागितले तरी समाजाकडून किंवा आपल्या बहुसंख्य घरातून ते हक्क  देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. आपण कितीही म्हटलं की महिलांना समान अधिकार दिले पाहिजे तरीही समान अधिकार देण्यासाठी वेळोवेळी कायदे करावे लागले मात्र हे कायदे केल्यानंतरही कायदे तोडण्याची आणि महिलांचे दमन करण्याचे प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर आहे  मागील काही दिवसात जो वादंग माजला आहे त्या विषयावर समाजमंथन होणे अत्यावश्यक आहे.

शिवनीती आचरणात आणणे आवश्यक

उभ आयुष्य ज्या  छत्रपतीं शिवाजी महाराजानी स्वराज्य स्थापनेसाठी लढण्यात घालवलं ,सुराज्य आणले ,मंदिरांचे रक्षण केले त्या छत्रपतींच्या वारसांशी चांगले वर्तन असावे यासाठी कायदे करण्याची गरज असावी लागतच नाही! कारण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत असं कोणीही छातीठोकपणे सांगेल.मात्र नंतरच्या काळात शाहू महाराजांना जो अनुभव आला. त्याविरोधात ते ठामपणे उभे राहिले, जोरकस अशी भूमिका घेतली ती जबरदस्त होती. जे वेद मनुष्यप्राण्यांनी लिहिले  ऋषीमुनींनी लिहिले होते.  त्यातील मंत्र याचा अभ्यास असणे गरजेचे आहेच. मात्र हे वेदोक्त मंत्र इतर कोणी म्हणू नयेत हा आग्रह धरण्याचा अधिकार ब्राह्मणांना कोणी दिला?

वेदोक्त -पुराणोक्त हा वाद घालण्याचा अधिकार कोणी दिला? जर वेद आणि पुराण मानवनिर्मित असतील तर त्यात भेदाभेद करण्याचा अधिकार या बुद्धिवंतांना कोणी दिला? मुळात चातुर्वर्ण्य पद्धती ही लादण्याचा अधिकार यांना कोणी दिला?अगदी आपण श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतही वाचले, तर असे दिसून येते की चार वर्ण हे कामानुसार विभागले व  केले गेले होते . ग्रामव्यवस्था, समाजव्यवस्था नीट लावण्यासाठी या व्यवस्थेची रचना करण्यात आली होती आणि त्याला पुढे वर्चस्ववादी वृत्तीने धार्मिक बंधन लावून अनेक नियमात बसून आपणच कसे उच्च आहोत हे दाखवण्याचे काम त्याकाळच्या विद्वानांनी केले.अगदी त्याचा फटका ज्ञानेश्वर माऊलींना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही बसला त्यांच्या आई-वडिलांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. समाजात त्यांना त्रास भोगावा लागला आणि हा सगळा अनुभव घेतल्यानंतर भगवद्गीता सर्वसामान्यांना कळायला हवी ,लोकांना देव काय हा कळायला हवा म्हणून ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली.

भगवद्गीता सोप्या भाषेत लोकांना समजून सांगितली,  अखेरीस विश्वाच्या भल्यासाठी पसायदान मागितले आणि इतके करून झाल्यावरही माऊलींना समाधी घ्यावीशी वाटली हे सिनेमात आम्ही पाहिलं आणि लोकांकडून ऐकलं! पण माऊलीनी समाधी का घेतली? इतक्या लहान वयात विरक्ती कशी आली? असे प्रश्न मनात उभे राहतात! समाजाची मानसिकता इतकी नीच पातळीवर गेलेली असते की अत्यंत बुद्धिमान आणि जगावेगळे काही करणाऱ्या माणसांना संपवण्यासाठी चारी बाजूने आक्रमण करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असते आणि तोच प्रकार कदाचित ज्ञानेश्वर माऊलींबाबत घडला असेल का असे प्रश्नही मनात उपस्थित होत राहतात. या चारही बालकांना जगाच्या पडद्याआड नेणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या आजही कार्यरत आहेत हे सांगण्यासाठी कुठला ना कुठला वादप्रसंग घडावा लागतो. अन्यथा समाजात वर्चस्ववादी उच्च जातीवादी  धनदांडगे, सत्ता असणारे सत्ताधारी हे अगदी शांततेने आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तींचे दमन करत असतात. विविध मार्गाने हाती असलेल्या शक्तीने लोकांचे जगणं मुश्किल करतात.असाच प्रकार वर्तमानात नाशिकच्या काळाराम मंदिरात घडला! तोही छत्रपतींच्या वारसाबाबत

राजसत्तेवर  धर्मसत्ता प्रबळ होणे घातक!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील  वारसदार  मा संयोगिता राजे भोसले यांनी मंदिरात दर्शन घेताना जो वाद झाला, वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार त्यांना नाही असे सांगणारे पुजारी नंतर खोटं का बोलू लागले! हे सगळेच  मुळात कोणाला कोणता अधिकार आहे हे सांगण्याचे अधिकार देवाची सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांना कोणी दिला?असं कुठल्या कायद्यात म्हटला आहे की वेदोक्त आणि शास्त्रोक्त मंत्र हे  अमक्या-डमक्यानेच म्हणावेत.

आजवरचा जागतिक इतिहास पाहिला तर राजेशाहीच्या वरती अधीसत्ता गाजवणारी एक धर्मसत्ता असतेर; त्या धर्मसत्तेचे वर्चस्व वाढले की राजसत्ता आंधळी होते आणि धर्मसत्तेच्या आहारी जाऊन सर्वसामान्य जनतेवर अत्याचार करते.अशी जेव्हा धर्मसत्ताक प्रवृत्ती बळावते तेव्हा तेव्हा काही काळ अराजक तयार होते!   समाजाचा आवाज दाबला जातो, जनतेवर अत्याचार होतो आणि धर्ममार्तंड त्या देशाचं केवळ आपल्या स्वार्थासाठी नुकसान करतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं सगळं घडल्यानंतरही आपल्या राज्य सरकारने या विषयाची जराही दखल घेतली नाही, याचा अर्थ ही सगळी मंदिर जर सरकारच्या अखत्यारीत असतील, सर्व धर्माची  पूजास्थान  सरकारची मदत घेत असतील, धर्मादाय असतील ,काही स्वतंत्र असतील तरी अशांना  काही नियमावली असते की नाही.अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे आपला समाज अजूनही पुरुषी मानसिकतेत  आहे !आपण कितीही म्हटलं स्त्री पुरुष समान , वेतन समान ,त्यांच्यासाठी वागणूक समान : पण महिला कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर असली तरी महिलांबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना बहुसंख्य पुरुष साथ देतात असं नाही

राज्यसत्तेला राजधर्माचे विस्मरण

एक उदाहरण देते, मविआ सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड आताच्या शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत ते कसे काय. दुसरं शिवसेनेतून शिंदे गटात आलेले अब्दुल सत्तार हे  अजून मंत्री आहेत! ते जाहीरपणे ज्या प्रकारची शिवीगाळ चॅनल्सवर करत होते, ते केल्यानंतरही एका खासदार महिलेचा अपमान झाला, या मुस्लिम  तथाकथित हिंदुत्वनिष्ठ मंत्र्यांनी अभद्र कृत्य केले असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना न वाटणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे.

पण आजही शिवराळ अब्दुल सत्तार हे मंत्रिमंडळात कसे?  हा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘तपासून पाहतो ” हे उत्तर दिल्यावर सर्व पत्रकारांमधून एकच हास्यकल्लोळ होतो, त्यातील एकही माईचा लाल उठून मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना विचारत नाही की ,” साहेब काय तपासून पाहता‽” आणि अर्थात महिलांबाबत प्रश्न विचारणं आणि तसे प्रश्न विचारणे हे उचित आहे की नाही अशा प्रश्न वर्तमानात पडू लागलाय.

सत्ताकारण स्त्रीसन्मानाच्या वरचढ

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या शिंदे गटाच्या व भाजपाच्या राजकीय शत्रू असतीलही ; पण त्या ज्या प्रकारे भाषणात आपली बाजू मांडतात,  बोलतात त्या प्रकारे विद्वान विरोधक, सत्ताधाऱ्यांना बोलता येत नसेल आणि त्यांची गोची झाली असेल हे समजण्यासारखं आहे. संजय शिरसाठ यांनी बोलताना त्यांच्याबाबत लफडं हा शब्द वापरला आणि त्यांचा अपमान केला या अर्थाने त्यांच्यावर कारधाई होणे अपेक्षित  होते, मात्र त्यानंतरही शिरसाट वारेमाप बोलताना दिसतात “मी कोणाला घाबरत नाही” असे म्हणतात! अर्थात त्यांचेही बरोबर आहे पोलीस खातं त्यांचं आहे सरकार त्यांचं आहे.

कसं वागावं, कसं बोलावं याची शिस्त जर अशा लोकप्रतिनिधींना नसेल तर त्यांना समजावण्याचं अर्थात समज देण्याचं काम मंत्रिमंडळ प्रमुख मुख्यमंत्र्यांनी करायला हवं होत, पण ते तसं झालेलं दिसत नाही. मुळात एका स्त्रीने आपल्यावर अन्याय झाला आहे आणि त्याबाबत तक्रार घ्यावी असं पोलिसांना जाऊन म्हटलं असता पोलिसांनी तत्काळ तक्रार घेणे अपरिहार्य होतं ,मात्र  सुषमा अंधारे यांची तक्रार न घेणं हे कोणत्या नियमात बसत हा संशोधनाचा विषय. पोलीस खात्यावर कोणाचा दबाव आहे आणि ही तक्रार का घेतली गेली नाही याची चौकशी होण्याची गरज आहे. मुळात जर पोलीस एका पक्षाच्या उपनेते असलेल्या महिलेबाबत असे वागत असतील तर ते सर्वसामान्य महिलांशी कसे वागत असतील ? हाही विचार करण्याची वेळ हीच आहे.समजात असे प्रसंग निर्माण का होतात की ते मुद्दामून वादासाठी निर्माण केले जातात हा ही विचार मनात येतो. आजही समाजात पुरुषसत्ताक  मानसिकता दिसून येते.महिलांच्या प्रश्नावर हसणारे ते सगळेच आणि त्यांचं दमन करणारे  छत्रपती शिवाजी महाराजांचे, ज्ञानेश्वर माऊलींचे, शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार असूच शकत नाहीत.

समाजमाध्यमातील अभद्रेवर अंकुश हवाच!

तिसरा आणखीन एक विषय महत्त्वाचा ,समाज माध्यमातून महिलांना ज्या प्रकारे अर्वाच्च  भाषेत ट्रोलिंग केलं जातं, खोटी अकाउंट उघडून अभद्र वक्तव्य केली जातात त्यावर अंकुश लावण गरजेचे आहे. शिवसेनेच्या समाज माध्यम राज्य समन्वयक अयोध्या पोळ यांना व  इतरही महिलांन  ज्या भाषेत ट्रोल केल जातंय ती भाषा पाहता बिभत्स लोकांवर  तत्काळ कारवाई होण्याची गरज आहे! अयोध्या ही उच्चशिक्षित आहे आणि ती  आपल्या पक्षाचे आपली बाजू मांडते ती पाहून हतबल झालेले  त्यांच्या विरोधातील मंडळी  ज्या शब्दात लिहितात ही विकृती आहे. त्यावर पोलीस कधी कारवाई करतील हे पाहायचंय.

राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ही बाब  पोलिसांच्या निदर्शनाची गोष्ट आणून दिलेली आहे, मात्र हे सगळं होत असताना  सत्ता प्रशासकीय शक्ती ,धर्मशक्ती ,समाजातील तयार केलेले विकृत गट हे आणि त्यासोबत लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे असे  लोक जर समाजात विविध प्रकारचे भेद आणि विद्वेष तयार करत असतील तर त्याच्यावर अंकुश ठेवणं हे राज्य प्रमुखाचे कर्तव्य आहे आणि ते जर वेळेत होत नसेल तर ते दाखवून देणे हे प्रसार माध्यमांचं काम आहे.

सुषमा अंधारे यांचे  प्रकरणी कार्यवाही का नाही झाली?

आमदार संजय शिरसाठ यांचेवर कारवाई व्हायला पाहिजे अशा आशयाच ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना  केले. त्यांना सोयीने ट्रोल करण्यात आले. या ट्रोल करणाऱ्यांमध्ये भाजपच्या चित्रा वाघ दिसल्या आणि त्यांनी जी काही वक्तव्य केली ती पाहता सत्ताकारण हे  , स्त्री सन्मानाच्या पलीकडे चाललेय याची खात्री पटू लागते.

पत्रकारितेतही महिलांच्या हक्काबद्दल आणि महिलांच्या प्रश्नाबाबत गांभीर्याने विचार करण्याची क्षमता असणारे प्रश्न विचारणारे पत्रकारही कमी दिसतात! या विषयाचे गांभीर्य नसल्याने महिलांवरच्या प्रश्नावर महिला पत्रकारही हे राजकीय विषय आहेत किंवा ते  त्यांच्या बातमीचे  विषय आहेत असं मानत नाहीत.

खरोखर आम्ही स्वतंत्र आहोत का?

आपले संविधान  महत्त्वाचे!  सर्वधर्मसमभाव म्हणून आपला धर्म आपल्या घरात! अर्थात आमचा धर्म आम्ही कसा जोपासावा हे सांगण्याचे अधिकार कोणालाही  कुणीही दिलेले नाहीत. ते  हक्क मिळवण्याचे काम  पूर्वी झाले ते आता होता कामा नये आणि म्हणूनच स्त्री आहे म्हणून कमी लेखणे, ब्राह्मण नाही म्हणून इतर धर्मियांना कमी लेखणे, ब्राह्मणेतराना विशिष्ट अधिकार नाहीत हे सांगणे, त्यांची टिंगल उडवणे ,अभद्र भाषेत टीका करणे ही सगळी विकृत मानसिकतेची लक्षणं आहेत.

आपण महागाई,सिलेंडर दरवाढ, वीज दरवाढ, बेरोजगारीचा विषय,  शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, बिल्डरांचे अतिक्रमण व सोयीने मध्यमवर्गीयांचे होणारे शोषण, मोकाट सुटलेले पैसे डुबवणारे धनदांडगे आणि  त्यांना सोयी आणि सवलती देणारे सरकार हे सगळं पाहता आपण खरोखरच स्वतंत्र आहोत का?

आपल्याकडे सुराज्य कधी येणार? सत्ताकारण सोडून राज्यकर्ते आणि विरोधक लोकहितासाठी कधी काम करणार हे प्रश्न आहेत? मोर्चे, आंदोलन, गर्जना, एकमेकांवर कुरघोड्या, शाब्दिक हल्ले हे आता सगळं विनोदी वाटायला लागलेय! ज्यांना या सगळ्या विषयात लाभ होतो ते सोडून सर्वसामान्य लोकांना या विषयात स्वारस्य नाही! त्यांना जगण्याचा प्रश्न पडलेला आहे. आज जर मा बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी नक्कीच जनतेच्या बाजूने आवाज उठवला असता! शिवसेनेचे मुळ व शक्ती  सर्वसामान्यासाठी  काम करण्यात आहे, विषय सोडवण्यात आहे ! ते कधी होणार?

जनता त्रस्त आहे!…आणि म्हणूनच  काहीतरी चांगलं घडावं अशी अपेक्षा करताना स्त्री सन्मान, समानता, समभाव ,बंधुता,  अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टींना सामाजिक चळवळीचे स्वरूप आले पाहिजे! समाजातून या सुधारणा व्हायला पाहिजेत नेत्यांनी नेत्यासारखं कसं वागावं याची आचारसंहिता होत असताना समाजातील 50% असलेल्या स्त्रीशक्तीचे प्रशिक्षण आणि त्यांची आपल्या विषयांवर आवाज उठवण्याची तयारी करण्याची गरज आहे.

कदाचित येणारा काळात अशा प्रकारचे नेतृत्व तयार होईल . महाराष्ट्रात पक्षातीत अशी चळवळ तयार होऊन या अनेक मुद्द्यांवर बोलू लागेल आणि तेव्हाच या परस्पराविरोधात भांडणाऱ्या पक्षांना आपण नक्की काय करतोय याचं भान येईल. सध्याची परिस्थिती मात्र अशी आहे की आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय! याला पत्रकारिताही अपवाद नाही आणि हेच आपलं दुर्दैव आहे.