शिरुर तालुक्यातील शालिरेक्स कंपनीला सामाजिक कार्यकर्ते तेजस यादव यांच्यामुळे दणका…

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): पुणे प्रदुषण नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पुणे-नगर महामार्गालगत सणसवाडी येथील शालिरेक्स पॉलीव्हीनाईल प्रा. लि. कंपनीचे उत्पादन ४८ तासात बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाने (MPCB) दिले आहेत. या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणावर वायु प्रदुषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी MPCB ने केलेल्या स्थळ पाहणीत कंपनीने अनेक पर्यावरण कायद्याचा भंग केला असल्याचे समोर आले होते. याबाबत सुचविलेल्या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कंपनीचे उत्पादन काही तासात बंद करण्याचे आदेश एमपीसीबीने दिले आहेत.

शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शालिरेक्स कंपनीमध्ये पीव्हीसी कोटिंगचे काम केले जाते. दरम्यान या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणावर वायु प्रदुषण होत आहे. अशी तक्रार स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच निमगाव म्हाळुंगी गावचे माजी उपसरपंच तेजस यादव यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दि 24 मार्च 2023 रोजी कंपनीची स्थळ पाहणी केली. त्यामध्ये पर्यावरण कायद्यांचा भंग झाल्याचे निदर्शनास आले.

याबाबत महामंडळाने कायद्याचे पालन करुन त्या अनुषंगाने बदल करण्याचे निर्देश कंपनीला दिले आहेत. या दरम्यान कंपनीकडून पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक कायद्यांचे पालन केले गेले नाही. म्हणून महामंडळाने कंपनीला आदेश काढला होता. मात्र कंपनीने कोणत्याही प्रकारचे उपाय योजना केल्याचे दिसून आले नाही. तसेच कंपनीने MPCB आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे MPCB ने १४ जुलैला कारवाई करण्याचे आदेश दिले.

४ ऑगस्टला एनजीटी मध्ये सुनावणी…

शालिरेक्स कंपनीविरोधात वारंवार तक्रारी दाखल करुनही MPCB कडुन कंपनीविरोधात कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती. कंपनीतून बाहेर पडणाऱ्या धूरामुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्यांना, तसेच स्थानिक रहिवाश्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात स्थानिकांसह अनेक सामाजिक संघटनांनी MPCB कडे तक्रार केली होती. आता मंडळाने कंपनीचे उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला आहे. मात्र जोपर्यंत कंपनीकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार आहे असे स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस यादव यांनी सांगितले आहे.