शिरुर तालुक्यात रांजणगाव गणपती येथे आढळला दहा फुटी अजगर 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): रांजणगाव गणपती येथील देवाचीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार शेळके हे घरी जात असताना त्यांच्या वस्तीच्या शेजारुन एक भला मोठा साप रस्त्यावरून घरांकडे जाताना त्यांना दिसला. त्यांनंतर त्यांनी तातडीने नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष रामेश्वर ढाकणे यांना त्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात रामेश्वर ढाकणे, सर्पमित्र गणेश टिळेकर, वैभव निकाळजे, रोहित मुळे, राहुल गायकवाड, चैतन्य निकाळजे, सनी महागडे, विशाल काळे यांच्यासह संस्थेच्या सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

यावेळी गणेश टिळेकर व रामेश्वर ढाकणे यांनी पाहणी केली असता तो साप 10 फुट लांबीचा भारतीय अजगर असल्याचे समजले. साप झुडपामध्ये गेल्यामुळे सर्व सदस्यांच्या अथक प्रयत्नांनी त्याला पकडण्यात यश आले. नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष गणेश टिळेकर यांनी साप पकडल्यानंतर जमलेल्या नागरिकांना पावसाळ्याचे दिवस असल्याने सापाबद्दल माहिती देत सतर्क राहण्यास सांगितले.

यावेळी देवाचीवाडी ग्रामस्थांनी सर्पमित्र गणेश टिळेकर आणि रामेश्वर ढाकणे यांच्या सर्व टीमचे कौतुक करत आभार मानले. त्यानंतर वनरक्षक वंदना चव्हाण वनपाल गणेश मेहेत्रे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पकडलेल्या अजगरास कात्रज येथील प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात येणार असल्याचे गणेश टिळेकर यांनी सांगितले. यावेळी सागर खेडकर, राजेंद्र खेडकर, बाळासाहेब खेडकर, चंद्रकांत शेळके, प्रकाश खेडकर, सावता खेडकर, सारंग वाघमारे, दिलीप अभंग, नितीन खेडकर,नागेश शेळके, संभाजी शेळके, संभाजी वाघमारे व ग्रामस्थ उपस्थित होते.