शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आदर्श शिक्षक असलेले मायेची उब फाउंडेशनचे संस्थापक राहुल चातुर हे गेली अनेक वर्षापासून थंडीच्या दिवसांमध्ये आदिवासी मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असून त्यांनी नुकतेच काही सहकाऱ्यांच्या मदतीने आदिवासी मुलांना बाल दिनाच्या निमित्ताने उबदार कपड्यांचे वाटप केल्याने आदिवासी मुलांना मायेची उब मिळाली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आदर्श शिक्षक राहुल चातुर यांनी पिंपरी दुमाला शालेय समितीच्या अध्यक्षा कल्पना खळदकर व ग्रामपंचायत सदस्य शरद खळदकर यांच्या मदतीने आंबेगाव तालुक्यातील तिरपाड केंद्रातील बालवीर वाडी, पिंपरगणे, न्हावेड, सडकेची वाडी व कापरवाडी या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मायेची उपक्रमा अंतर्गत उबदार रजई, चादर, कानटोपी यांसह आदी साहित्याचे वाटप केले, याप्रसंगी सरपंच सोमा दाते, केंद्रप्रमुख सखाराम गेंगजे, मच्छिंद्र झांजरेसर, शाळा समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर शेखरे, कल्याण कोकाटे, संपदा गाढवे, लता नलावडे, वैशाली भालेराव, संगीता नवले, शोभा खरगे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदिवासी भागातील मुलांचे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने हा उपक्रम राबवत असल्याचे मायेची उब फाउंडेशनचे संस्थापक राहुल चातुर यांनी सांगितले. तर यावर्षी जिल्ह्यातील आदिवासी भागातील सुमारे 200 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे कल्याण कोकाटे यांनी सांगितले. यावेळी जावजी गवारी यांनी सर्वांचे आभार मानले.