शिक्रापूर ग्रामपंचायतचे राजकारण वेगळ्या वळणावर

मुख्य बातम्या शिरूर तालुका

मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आल्याने तर्कवितर्क

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायत मध्ये सरपंच बांदल गटाचा तर उपसरपंच मांढरे गटाचा अशी स्थिती असताना नुकतेच मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आलेले असताना उपसरपंच पदाच्या निवडणुकीवेळीच अचानक सरपंच रुग्णालयात दाखल झाले असल्याने शिक्रापूरचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहचून मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आल्याने गावात वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायत मध्ये सरपंच पद आरक्षित असल्याने ते एकच राहणार असताना सध्या सरपंच एका गटाचा तर उपसरपंच एका गटाचा अशी स्थिती असताना सरपंच बांदल गटाचा तर उपसरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते व आबाराजे मांढरे यांच्या गटाचा राहिलेला आहे. मात्र नुकतेच विरोधक असलेले मंगलदास बांदल व आबाराजे मांढरे दोघे एकत्र आले असताना आज नव्याने उपसरपंच पदाची निवडणूक होणार असताना मंगलदास बांदल व आबाराजे मांढरे यांनी मिळून त्यांच्या गटाचा उपसरपंच करण्याचे प्रयत्न सुरु केले.

मात्र एक सदस्य कमी असल्याने सरपंच गटाचा उपसरपंच सध्या तरी होऊ शकत नाही असे लक्षात येताच अचानकपणे पहाटेच्या सुमारास सरपंच रमेश गडदे आजारी असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल झाले व त्याबाबत ग्रामपंचायतका अर्ज देखील दिला, तर उपसरपंच गटाने देखील त्यांचा तक्रारी अर्ज देऊ केला.

त्यानंतर उपसरपंच गटाचे माजी उपसरपंच सुभाष खैरे, रमेश थोरात, मयूर करंजे, विशाल खरपुडे, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, मोहिनी मांढरे, सिमा लांडे, वंदना भुजबळ, सारिका सासवडे, कविता टेमगिरे यांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात जात ग्रामदैवताला साकडे घालत सरपंच रमेश गडदे यांनी लवकर बरे करुन उपसरपंच पदाची निवडणूक घेण्याची सद्बुद्धी देण्याची प्राथना करत सरपंच दाखल असेलल्या रुग्णालयात जात सरपंच यांची विचारपूस करुन तब्बेतीची काळजी घेण्याची विनंती करत डॉक्टरांशी चर्चा करुन सरपंच यांना लवकर बरे करण्याची विनंती केली आहे. मात्र अचानकपणे घडलेल्या घडामोडीमुळे ग्रामस्थ देखील चक्रावून गेले असून शिक्रापूरच्या राजकारणात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिक्रापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज घेण्यात येणार होती. त्याबाबत नोटीस देखील सर्व सदस्यांना दिलेले होते. मात्र अचानक आज सकाळी सरपंच रमेश गडदे हे आजारी असल्याबाबतचा त्यांचा अर्ज कार्यालयात प्राप्त झाल्याने सध्या उपसरपंच पदाची निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.