aayushaman-bharat-shirur

शिरुर तालुक्यातील कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली कानउघडणी

आरोग्य शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) “आपण शासनाच्या आरोग्य सेवेत कार्यरत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अडचण होणार नाही याची दक्षता घेतानाच रुग्णांना तत्पर व वेळेवर अत्यावश्यक रुग्ण सेवा द्या” अशा कडक शब्दात कवठे-येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर मोरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ नामदेव पानगे यांनी कान उघडणी केली आहे.

“कवठे-येमाई आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा” अशा आशयाची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने वरीष्ठ आधिकाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेबाबत नागरिकांच्या आलेल्या तक्रारी नंतर कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. यावेळी कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे, डॉ संदीप शिरसाठ,डॉ सुभाष पोकळे, दीपक रत्नपारखी, पत्रकार सुभाष शेटे, “शिरुर तालुका डॉट कॉम” चे विशेष प्रतिनिधी अरुणकुमार मोटे, जयदिप लंघे, जितेश पवार,आरोग्य सेवक,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणी व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. रुग्णांना वेळेवर औषोधोपचार व आरोग्य सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून सेवक व कर्मचाऱ्यांनी वेळेचे बंधन पाळावे, रुग्ण व नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना युवा क्रांती पोलीस मित्र, माहिती अधिकार, ग्राहक व पत्रकार संरक्षण संघटनेचे पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे,यांनी केल्या. त्यानंतर उपस्थित सेवक आणि कर्मचाऱ्यांनी यापुढे कामात दक्षता घेण्याचे व वेळेचे बंधन पाळण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.