जांबूत येथील उपबाजार समिती लवकर चालू करावी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

बेट भागातील शेतकऱ्यांची मागणी

शिरूर: (अरूणकुमार मोटे): शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या आणि सुमारे पन्नासहून अधिक गावांच्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याच्या दृष्टीकोनातून गेली १५ वर्षांहून अधिक काळ बंद अवस्थेत असणारी शिरूर तालुक्यातील जांबूत येथील उपबाजार समिती लवकरच चालू करण्यात यावी .अशी मागणी बेट भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

जांबूत (ता.शिरूर) येथे कोट्यावधी रूपये खर्च करून कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर अंतर्गत उपबाजार समितीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. परंतु गेली अनेक वर्षे सदरचे बाजारगाळे आणि गोडाऊन धूळखात पडल्याचे दिसून येते. परंतु जांबूत (ता.शिरूर) येथील उपबाजार समिती चालू झाल्यास शेतकऱ्यांना आपला शेतमाल व भाजीपाला उपबाजार समितीत विक्रीसाठी आणता येणे शक्य होणार आहे. परिणामी गावाचा महसूल वाढण्यास मदत होणार असून छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक, हमाल व इतर मजूर यांचे हाताला काम मिळण्यास मदत होण्याच्या होण्याच्या दृष्टीने हि उपबाजार समिती महत्वाची ठरणार आहे. शिरूर-आंबेगाव-पारनेर-जुन्नर आदि तालुक्याच्या सरहद्दीवर जांबूत हे गाव येत असल्याने तसेच वाहतुकीच्या दृष्टीने बेल्हे-जेजुरी राज्यमार्ग, तसेच नव्याने होत असलेला गायमुख (मंचर) ते शिक्रापूर मार्ग तसेच अष्टविनायक महामार्ग यामुळे वाहतुकीसाठी सोय निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांचा काढलेला ताजा शेतमाल, तरकारी, भाजीपाला लवकरच शहरात पोहचण्यास मदत होऊन शेतकऱ्यांना जागेवर योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.

चार तालुक्याचा विचार करता शेतकऱ्यांना आळेफाटा, शिरूर, नारायणगाव, मंचर आणि पुणे आदी ठिकाणी आपला शेतमाल पाठवावा लागत आहे. परंतु जर जांबूत येथील उपबाजार समिती चालू झाली तर परिसरातील जांबूत, पिंपरखेड, कवठे, सविंदणे , मलठण,काठापूर खुर्द, शरदवाडी, वडनेर, चांडोह, फाकटे, टाकळी हाजी, तर पारगाव तर्फे आळे, निमगाव, साकोरी, भागडी, देवगाव, कावळ पिंपरी, शिरापूर, चोंभूत, आळकुटी, म्हस्केवाडी, लाखणगाव, औरंगपुर आदी परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ऊस उत्पादनाच्या तुलनेत घोड आणि कुकडी नदीचे बारमाही पाणी आणि कुकडी कालव्याचा मोठा विस्तार येथे असल्याने या भागातील शेतकरी हा तरकारी पिकांचे मोठे उत्पादन घेत आहे,

परंतु शेतमाल विक्रीच्या दृष्टीने विचार करता योग्य वेळेत शेतमाल बाजारात पोहचला नाही तर शेतकऱ्याला अनेकदा मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या आळेफाटा, मंचर, नारायणगाव, ओतूर येथील बाजार समित्या यांचेपासून जांबूत (ता. शिरुर) हे अंतर लांब पल्ल्याचे असल्याने शेतमाल पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. तसेच मालवाहतूक गाड्यांचे भाडे, हमाली हा खर्च उत्पन्नाच्या तुलनेत वाढणारा ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळून शेतमाल विकण्याची व्यवस्था जवळ होऊन पारदर्शक कारभार होण्यास मदत होणार आहे. तसेच वेगवेळ्या मार्गाने होणारी आर्थिक फसवणूक थांबून, पारदर्शी वजनमाप होऊन मालाचा योग्य मोबदला रोख स्वरुपात शेतकऱ्यांना मिळेल या दृष्टीने जांबूत येथील उपबाजार समिती लवकर चालू होणे गरजेचे आहे.

जांबूत (ता. शिरुर) येथील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेली उपबाजार समिती चालू होणे गरजेचे आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल योग्य वेळेत बाजारामध्ये विकता येऊन योग्य मोबदला भेटण्यास मदत होणार असून सदरची उपबाजार समिती लवकरच चालू होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

अरूण साकोरे, सहाय्यक निबंधक , शिरुर