नवी मुंबई, नाशिक जिल्ह्यातील अवैध उत्खननावर तात्काळ बैठकीचे आयोजन करा

इतर

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत, सह्याद्री पर्वत आणि मुंबईत सुरू असलेल्या अवैध उत्खनन रोखण्यासाठीच्या उपाय योजनांसंदर्भात तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना आज विधान परिषदेमध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत आहे. नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत आणि सह्याद्री पर्वतात अवैध उत्खनन रोखण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत आ. सुनील शिंदे, आ. विलास पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी ठोस निर्णयाची मागणी केली.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी या विषयावर तात्काळ बैठक आयोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच आजच बैठकीची तारीख जाहीर करण्यास सांगितले. नवी मुंबईत दहा वर्षांपूर्वी डोंगर दिसत होते. ते आता भुईसपाट होताना दिसतात. त्यामुळे कालमर्यादा ठरवली पाहिजे अन्यथा सगळीकडचे डोंगर संपतील का काय, असा प्रश्न निर्माण होईल, असेही सूचित केले. यावर महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी १३ मार्च रोजी बैठक घेतली जाईल आणि सुरु असलेल्या उत्खननाला तात्काळ स्थगिती देण्यात येईल असे सभागृहाला सांगितले.