३ बहिणींची जिद्द, गुजराथी थाली पाहा फक्त ८० रुपयांत भरपेट जेवण…

इतर

गुजरात: वरण, भात, २ भाज्या, पोळ्या, सलाड, ताक, पापड, लोणचं असं सगळं भरलेलं ताट. शिवाय हे सगळं अनलिमिटेड.. म्हणजेच ज्याला जेवढं पाहिजे, तेवढं तो मागून खाऊ शकताे. अशी साग्रसंगीत भरपेट जेवण केवळ ८० रुपयांत देणारी गुजरातमधली गुरुकृपा खानावळ आणि ती चालविणाऱ्या तिघी बहिणी सध्या सोशल मिडियावर चांगल्याच गाजत आहेत.

सोशल मिडियावर बऱ्याचदा अशा प्रेरणादायी गोष्टी बघायला मिळतात. एखाद्याचं काम, एखाद्याची जिद्द कुणाला तरी नवी उमेद, उत्साह, उर्जा देणारी ठरते. अशा प्रकारचाच हा एक व्हिडीओ आहे. सगळं कुटुंब मिळून उत्साहात खानावळ चालवत आहे, मदत सगळ्यांचीच होते आहे, पण या व्यवसायाची धुरा मात्र तिघी बहिणी सांभाळत आहेत.

विशेष म्हणजे या बहिणी वयाने खूप काही मोठ्याही नाहीत. १५ ते २० वर्षे या वयोगटातल्या त्या असाव्या, असं त्यांच्याकडे बघून जाणवतं. यावेळी बोलताना मोठी बहिणी म्हणाली की खानावळ चालवणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. त्यांच्या आजोबांच्या काळापासून त्यांची ही खानावळ आहे.

आजोबांच्या काळात सुरुवातीला खानावळीचे स्वरुपही मर्यादित होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी खानावळीचा कारभार हाती घेतला आणि आता मात्र या तिघी बहिणी पुढाकार घेऊन खानावळ चालवत आहेत. धडाडीने काम करुन त्यांच्यापरीने व्याप अधिकाधिक मोठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक बहिण पोळ्या करते, कुणी वरण आणि भाज्या करते तर कुणी सगळा दिवसभराचा हिशेब सांभाळते. त्यांचं काम बघून अनेक नेटीझन्सनी या बहिणींचं मनापासून कौतूक केलं आहे.