आमदार निलेश लंके यांच्यासोबत ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं?

इतर

शिरुर: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके हे आडल्या नडलेल्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असलेले नेते म्हणून ओळखले जातात. दरम्यान, त्यांच्यासोबत 2 दिवसांपूर्वी मुंबईत एक घटना घडली.

८ सप्टेंबर २०२२ ची रात्र. बाहेर धो धो पाऊस सुरु होता. यावेळी आमदार निलेश लंके मुंबईहून पारनेरकडे येत होते. यावेळी त्यांना पाम बीच रोडवरील न्हावा शेवा ब्रिज खाली एक कुटुंब दिसले. त्यांनी गाडी बाजूला घेऊन त्या कुटुंबाची विचारपूस केली. ते कुटुंब मुळचे उस्मानाबादचे. रोज पोटापाण्यासाठी मिळेल ते काम करायचं आणि रात्री ब्रीज खाली येऊन झोपायचं हा त्यांचा दिनक्रम.

आमदार महोदयांना ही गोष्ट कळाल्यावर त्यांनी त्या कुटुंबियांना खायला काही पदार्थ दिले. यावेळी त्या रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबाच्या डोळ्यात आपोआप अश्रू तरळले. त्यानंतर आमदारांनी त्यांना पारनेर तालुक्यात काम आणि निवासाची सोय करुन देण्याची ग्वाही दिली.

आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षकांचा एल्गार; वाचा प्रकरण

पारनेरला राहण्याची आणि कामाची सोय करुन देण्याची ग्वाही दिल्यानंतर त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याचबरोबर अशा बेघर कुटुंबांना शक्य झाल्यास मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, भर पावसात रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या कुटुंबाला राहण्याची आणि कामाची सोय करुन देणारे आमदार अचानक देवासारखे भेटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं.

आमदार निलेश लंके यांची पोस्ट

८ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईहून पारनेरकडे येत असताना पाम बीच रोडवरील न्हावा शेवा ब्रिज खाली एक कुटूंब दिसले. मुंबईत जोराचा पाऊस सुरु होता. अशा अवस्थेत ते कुटूंब त्या पुलाखाली निवारा घेत होते. त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता ते बाळू शंकर पवार नावाचे गृहस्थ होते व ते मुळचे उस्मानाबादचे होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी, 2 लहान मुले व बहिण तोळाबाई होती. हे कुटूंब दिवसभर जे काम मिळेल ते करुन आपल्या पोटाची भुक भागवित होते व रात्री या पुलाखाली निवारा घेत होते.

त्यांची आस्थेवाईक चौकशी करुन त्यांना खायला दिले त्यामुळे पवार कुटूंबाचे डोळे भरुन आले. या पुलाखाली राहणाऱ्या कुटूंबाला पारनेर येथे हाताला काम व राहण्याची सोय करण्याची हमी दिली. आपली कामाची व राहण्याची व्यवस्था व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो आपण पारनेरला येणार का? या प्रश्नावर त्यांनी पारनेरला येण्याची सहमती दर्शवली. यावेळी या कुटूंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.

कालच त्यांनी मला संपर्क केला होता. लवकरच त्यांची पारनेर येथे कामाची व निवासाची सोय करुन देणार आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांशी त्यांचा संपर्क करुन देणार आहे. या कुटूंबासारखे आणखी काही कुटूंब जीवन जगत असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. मी त्यांची त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करुन देईन. शक्य झाल्यास त्यांना रोजगार व निवासाची व्यवस्था करुन देण्याचा प्रयत्न करीन असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.