wolf hunting

लबाड लांडगं ‘प्रेमाची’ शिकार करून फिरतयं मोकाट…

क्राईम

शिरूर (तेजस फडके): एका लबाड लांडग्याने ‘प्रेमाची’ शिकार केली असून, अगदी उघड माथ्याने मोकाट फिरताना दिसत आहे. कारण, लबाड लांडग्याला दुसऱ्या ढोंगी लांडग्याने मदत केली आहे. पण, लबाड लांडग्याचे आजचे मरण फक्त उद्यावर गेले आहे.

एका लबाड लांडग्याने एक सावज शोधले होते. सावजाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सावज त्याच्या भूलथापांना बळू पडून अलगद त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले. लबाड लांडग्याने पुढे काही दिवस प्रेमाचे नाटक केले. कारण, सावजाला एक आसरा हवा होता. प्रेमाच्या भुकेलेल्या सावजाला आपली शिकार होत असल्याचे समजत नव्हते. लबाड लांडग्याच्या मनात वेगळेच काही होते. सावज आपल्या दोन पिल्लांना कुशीत घेऊन राहात होते. दिवस पुढे-पुढे जात होते.

लबाड लांडग्याने रंग बदलायला सुरवात केली. कारण, त्याला हवे ते मिळाले होते. सावजाला छळायला सुरवात केली. सावज आपल्या दोन पिल्लामुळे त्रास सहन करत राहिले. लबाड लांडगा पुढे तर अधिकच आक्रमक होऊ लागला. त्याने छळाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. सावज जिवंतपणीच मरण यातना भोगू लागले होते. लबाड लांडगा कधी पण येऊन लचके तोडू लागला होता. सावजाला शरिराचे लचक्यांपेक्षा मनाचे तोडलेले लचके जास्त त्रास देत होते.

लबाड लांडग्याच्या लचक्यांना कंटाळून सावजाने पिल्लांसमोरच जगाचा निरोप घेतला. पिल्ले उघड्यावर पडली. लबाड लांडग्याने आपण अडकणार असल्याचे लक्षात येताच हालचाल सुरू केली. स्वःताला वाचविण्यासाठी नको ते पर्याय अवलिंबले. मदतीसाठी ज्यांच्या पुढे हात पसरले, त्यांनाच जाळ्यात अडकवले. कारण, दुसरा ढोंगी लांडगा त्यामध्ये स्वःताचा फायदा पाहात होता. ढोंगी लांडग्याने लबाड लांडग्याला काही प्रमाणात वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. पण, लबाड लांडगा आज मोकाट फिरत असला तरी आजचे मरण केवळ उद्यावर गेले आहे.
(क्रमशः)