गोरक्षक व शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची पुणे नगर महामार्गावर धडाकेबाज कारवाई

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार कत्तलीला चाललेली जनावरे व गोमांस जप्त केल्याच्या घटना घडत असताना आता शिक्रापूर येथून 6 हजार किलो गोमांस घेऊन जाणारी 3 वाहने पकडून गोमांस जप्त करत चक्क तिघांना अटक करण्यात गोरक्षक व शिक्रापूर पोलिसांना यश आले असून वाहतूक करणाऱ्या मुजीब मारुब पठाण, सय्यद परवेज अख्तर, रहेमुद्दिन महेबूब कुरेशी या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून अहमदनगर हून पुणे कडे काही वाहने गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली. त्यानंतर शिवशंकर स्वामी, गोरक्षक कृष्णा माने, श्रेयस शिंदे, कृष्णा सातपुते, प्रकाश कदम, हर्षद पाखरे, गणेश शिंदे, रुपेश सपकाळ, सर्पमित्र शेरखान शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस हवालदार बापू हडागळे, कल्पेश राखोंडे यांसह आदी शिक्रापूर येथील पाबळ चौकात थांबले असताना त्यांना पहाटेच्या सुमारास काही वेळेत एकामागे एक एम एच १६ ए वाय ६२८०, एम एच १४ एच यु १८४१ व एम एच १४ ए झेड ४२५१ हि 3 वाहने आल्याचे दिसून आले. त्यावेळी उपस्थित गोरक्षक व पोलिसांनी वाहन चालकांना थांबवित पाहणी केली असता त्यामध्ये गाय, बैलांचे कापलेली मुंडके, पाय व इतर शरीर मिळून आले.

दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर चे गोमांस हे अहमदनगर जिल्ह्यातून पुणे येथे देण्यासाठी चाललो असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी दोन्ही तीनही वाहने जप्त करत तब्बल 8 लाख रुपये किमतीचे 3 वाहने तसेच 10 लाख 80 हजार रुपये किमतीचे 3 हजार किलो गोमांस असा तब्बल 18 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७) रा. आनंदनगर सिंहगड पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गोमांस वाहतूक करणाऱ्या तीनही वाहनांवरील चालक मुजीब मारुब पठाण (वय ३२) रा. घासगल्ली अहमदनगर, सय्यद परवेज अख्तर (वय ३०) रा. कसाई गल्ली अहमदनगर व रहेमुद्दिन महेबूब कुरेशी (वय २९) रा. माजलगाव ता. बीड जि. बीड या तिघांवर गुन्हे दाखल करत तिघांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.